Pimpri: आता शहर काँग्रेसची धुरा सांभाळणार कोण ?

प्रतिकुल परिस्थितीत कोण होणार नवा कर्णधार ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आज या बालेकिल्यातून काँग्रेस नामशेष झाली आहे. शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. सध्या राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये असून पालिकेत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे आता या अशा कठीण परिस्थितीत शहर काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरातून काँग्रेस नामशेष झाली. पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे काँग्रेसची अवस्था मरणासन्न झाली आहे. पालिका निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील नऊ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाला. पालिकेत काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा दिला होता. पक्षाने तो नामंजूर करत साठे यांना पुन्हा तीन वर्ष मुदत वाढ दिली होती. त्यानंतर साठे यांनी कार्यकारिणी जाहीर देखील केली होती. परंतु, रविवारी (दि.8) राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे शहराध्यक्ष साठे यांनी तडाकफडकी राजीनामा दिला.

तसेच आपण स्वखुशीने राजीनामा देत असून पुढील काळात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, यामगे वेगळेच कारण असल्याचे काँग्रेसचे नेते खासगीत सांगतात. यांच्या त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याची कुजबूज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. साठे यांच्या राजीनाम्यानंतर सोमवारी (दि.9) सर्वंच पदाधिका-यांनी पदाचा सामूहिक राजीनामे दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे पाठविले असून यामुळे शहर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शहराध्यक्ष साठे यांनी पक्षाच्या व्यासपीठावर शहरातील कार्यकर्त्यांची व्यथा मांडली. त्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत आहोत. त्यामुळे आमच्यावर असलेल्या जबादारीतून मुक्त करुन आमचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच पक्षाच्या विश्वासाबद्दल ऋण व्यक्त करत पुढील काळात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहू, असे राजीनामा पत्रात म्हटले आहे. या पदाधिका-यांचे आठ दिवसात राजीनामे श्रेष्टींकडून स्वीकारले जाणार असल्याचे, काँग्रेसच्या एका गटाने खासगीत बोलताना सांगितले.

शहरात भाजपचे पाळेमुळे रोवली आहेत. पिंपरी-चिंवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. चिंचवडचा आमदार भाजपाचा असून भोसरीचे आमदार भाजपशी संलग्न आहेत. शिवसेनेचे दोन खासदार आणि एक आमदार आहे. पालिकेत नऊ नगरसेवक आहेत. शहरात शिवसेनेचे हक्काचे मतदार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहेत. राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक पालिकेत आहेत. राष्ट्रवादीचे संघटन ब-यापैकी शहरात आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचा पालिकेत एकही नगरसेवक नाही. शहरात काँग्रेसचा संघटन राहिले नाही. कार्यकर्ते पक्षापासून लांब चालले आहेत. पक्षासाठी प्रतिकूल परिस्थिती असून पक्षाचा काळ कठीण आहे. त्यामुळे पक्षाचे काम करणे जिकिरीचे आहे. या कठीण परिस्थितीत आज काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. पक्ष सक्षमपणे पुढे नेण्यासारखे एकही नाव आज पक्षात दिसत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.