Pimpri : पालिकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटीची मदत 

केरळ पूरग्रस्तांना दिली जाणार मदत 

एमपीसी न्यूज – केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून पिंपरी-चिंचवडमधून एक कोटी सहा लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पालिकेतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या सर्वपक्षीय 133 नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन आणि महापालिका कर्मचा-यांकडून एक दिवसाचा पगार असा एक कोटी सहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे आज (बुधवारी) सुपूर्त करण्यात आला. 

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सभागृह नेते एकनाथ पवार, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे उपस्थित होते.

केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण आहे. त्यांना या संकटातून वाचविण्यासाठी पिंपरी- चिंचवडच्या सर्वच 133  नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन केरळला मदत म्हणून देऊ केले होते.  नगरसेवकांना महिन्याला 15 हजार रुपये मानधन असून 133 नगरसेवकांचे 19 लाख 95 हजार रुपये झाले होते. तसेच अधिका-यांनी देखील एक दिवसाचा पगार दिला होता. एकूण एक कोटी सहा लाख रुपयांचा धनादेश केरळपूरग्रस्तांना देण्यासाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.