PCMC: महापालिका वैद्यकीय अधिकारी यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची संधी

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (PCMC) यांना राज्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या शिक्षणासाठी जाता येणार आहे. शिक्षण कालावधीत डॉक्टरांना वेतन, भत्ते दिले जाणार आहेत. एका वर्षात तीन डॉक्टरांना शिक्षणासाठी जाता येईल. याबाबतच्या धोरणाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर ज्येष्ठ वैद्यकीय अधिका-याची 16, तर वैद्यकीय अधिकारी अभिनामाची 82 पदे मंजूर आहेत. त्यातील 65 पदे भरलेली आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शासन सेवेतील वैद्यकीय अधिका-यासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेतील भरलेल्या पदांपैकी दरवर्षी पाच टक्के ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी आयुक्तांची लेखी पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.

पूर्वपरवानगीशिवाय अभ्यासक्रमास जाण्यासाठी कार्यमुक्त केले जाणार नाही. परीक्षेस बसण्यासाठी परवानगी (PCMC) मागणा-या अधिका-यांची नियुक्ती नियमित झालेली असावी. या अभ्यासक्रमासाठी पाच टक्के पदसंख्येपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी पात्र झाले. तर, सेवा ज्येष्ठतेनुसार परवानगी देण्यात येईल.

विभागीय चौकशी, फौजदारी प्रकरणे प्रलंबित किंवा सुरु असल्यास परीक्षेला बसण्यास अपात्र समजण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शुल्क वैद्यकीय अधिका-यांनाच भरावे लागेल. पदवी पूर्ण झाल्यावर महापालिकेत किमान पाच वर्षे सेवा करावी लागेल.

त्याबाबत हमीपत्र द्यावे लागणार आहे. या अटीचे पालन न केल्यास 50 हजार रुपये किंवा महापालिका विहित करेल एवढ्या दंडाची रक्कम भरावी लागेल. वैद्यकीय अधिका-यांनी अभ्यासक्रमाकरिता रुजू होऊन अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास किंवा मध्येच सोडून दिल्यास प्रतिनियुक्ती कालावधीत त्यांना देण्यात आलेले वेतन, भत्ते त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहेत.

Akurdi News : आकुर्डीत खान्देश मराठा पाटील समाज संघाचा वर्धापनदिन उत्साहात

महापालिकाला पदव्युत्तर झालेले कायमस्वरुपी डॉक्टर मिळत नाहीत. त्यासाठी महापालिकेत कार्यरत असलेल्या ज्या वैद्यकीय अधिका-यांची पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा आहे. त्याबाबतची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यांना अभ्यासक्रम शिकण्यासाठी पाठविले जाणार आहे. दरवर्षी तीन वैद्यकीय अधिका-यांना पाठविले जाईल. यामुळे महापालिकेला तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील, असे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.