PCMC : ‘प्रगती’ची माहिती सक्षमपणे लोकांपर्यंत पोहचावा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) राबविण्यात येत असलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेचा मुख्य हेतू गतीमान प्रशासन, पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभतेने माहिती पोहोचविणे हा आहे. यासाठी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने सकारात्मक कामकाज करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिले.

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणे, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती) अभियान’ राबविण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त खोराटे बोलत होते.

आमदार उमा खापरे, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता रामदास तांबे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, आमदार अण्णा बनसोडे यांचे स्वीय सहाय्यक अजित गरूड, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, लेखाधिकारी राजू जठार, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Chinchwad : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दारू भट्ट्यांवर छापे

शासन निर्णयानुसार ‘राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती)’ अभियानाचा कृती कालावधी दिनांक २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर निश्चित केलेला आहे. या कालावधीत राज्य स्तरावर तसेच तालुका, जिल्हा विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती) अभियान राबविण्यात येणार आहे.

सदर अभियान 2001 पासून संपुर्ण राज्यात राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत यशस्वी कार्यालयांना (PCMC) यापुर्वी पारितोषिके वितरीत करण्यात आली आहेत, तसेच सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ आणि लोकाभिमुखता या दोन मुख्य बाबींच्या आधारे अभियानाचे कार्यक्षेत्र व कार्यपद्धती शासनामार्फत निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी बैठकीत दिली.

मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी प्रास्ताविक करताना महापालिका गटात प्रथम क्रमांकासाठी 10 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 6 लाख रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ४ लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम शासनाने निश्चित केली आहे, अशी माहिती देऊन महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या योजनांचा कृती आराखड्याचे संगणकीय सादरीकरण आज झालेल्या बैठकीत केले.

सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी सात कार्यक्षेत्रे निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये खालील कार्यक्षेत्रे आणि निकषांचा समावेश आहे.

कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब, सेवांची गुणवत्ता/ दर्जा यामधील वाढ व उपक्रमांची परिणामकारकता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नस, संसाधनांचा पर्याप्त व प्रभावी वापर, तंटामुक्त कार्यालय, नाविन्यपुर्ण व पथदर्शी स्वरूपाच्या संकल्पना /प्रयोग/ उपक्रम राबविले जाणार आहेत.

‘राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती)’ अभियानासाठी दीड महिन्यांचा कृती कालावधी निश्चित करण्यात आला आहे, (PCMC) तसेच स्पर्धेकरिता कार्यालयामध्ये (दि. 20 ऑगस्ट 2022 ते 19 ऑगस्ट 2023) एका वर्षभरात करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांचा व नावीन्यपूर्ण उपक्रमांचा देखील विचार करण्यात येणार आहे. प्रगतीच्या निकषांचे योग्य पध्दतीने परीक्षण करता येईल तसेच प्रगती अभियानामध्ये गुणवत्ता मापनासाठी कालावधी एक वर्ष असल्याचेही निळकंठ पोमण यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.