PCMC ITI : महापालिकेच्या आयटीआयमध्ये आता उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजना राबविणार; विविध ट्रेड्स सुरू करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (PCMC ITI) आता उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. तसेच बदलत्या काळानुसार ड्रोन टेक्नोलॉजी, स्मार्ट सिटी टेक्नोलॉजी, मॅकेट्रोनिक्स, इलेक्ट्रिक वेहिकल टेक्नोलॉजी असे साधारणपणे 30 नाविन्यपूर्ण ट्रेड्स सुरु करण्याच्या दृष्टीने धोरण तयार करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली. शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक प्रणालीला अनुसरून उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी धोरण तयार केले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सुधारित शासन निर्णय झालेला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयटीआयमध्ये या योजना राबविण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले असून या धोरणास महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रशासक राजेश पाटील यांनी या धोरणास मान्यता दिली. महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यान्वित आहे, तर कासारवाडी येथे मुलींसाठी स्वतंत्रपणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध ट्रेड्स शिकवले जातात. आता या ट्रेड्समध्ये कालानुरूप बदल करून ज्या कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख ट्रेड्सची गरज आणि मागणी आहे असे ट्रेड्स नव्याने सुरु करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. या औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. असे मनुष्यबळ सहज उपलब्ध व्हावे तसेच युवकांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे ट्रेड्स (PCMC ITI) सुरु करण्याची आवश्यकता विचारात घेऊन धोरण तयार करण्यात आले आहे.

Ashadhi Wari : दिवेघाटात वारकऱ्यांसोबत सुप्रिया सुळेंची फुगडी

उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनांची (कमवा व शिका) प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत महापालिकेने उद्देश निश्चित केले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजना परिणामकारकरित्या राबवून संस्थांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे, प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर होणाऱ्या खर्चामध्ये बचत करणे, प्रशिक्षणार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक कौशल्यात व सरावात वाढ करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगार करण्यासाठी सक्षम बनवणे, प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांना औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष उत्पादन कामाचा अनुभव देऊन कामाबद्दल आत्मविश्वास व आवड निर्माण करणे, प्रशिक्षण संस्थेतील उपलब्ध यंत्रसामग्री साधनसामग्री व मनुष्यबळाचा महत्तम वापर करून संस्थेला उत्पन्न मिळवून देणे व त्यातून संस्थेसाठी नवीन आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करणे किंवा इतर संस्था विकास योजना संस्थेत राबविणे, या योजनेद्वारे संस्थेच्या परिसरातील कारखाने औद्योगिक आस्थापना शासकीय व निमशासकीय आस्थापना यांच्याशी संबंध निर्माण करणे व त्याचा फायदा संस्था व प्रशिक्षणार्थ्यांना मिळवून देणे, आदी उद्देशांचा समावेश आहे.

या बाबी लक्षात घेता उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेचे बळकटीकरण करणे, योजनेत नाविन्यता आणणे, योजनेचे सुलभीकरण करणे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सदर योजनेची अंमलबजावणी करून संस्थांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे.

PCMC Property tax : नागरिकांनी 30 जूनपर्यंत मालमत्ता कर सवलतीचा लाभ घ्यावा

‘हे’ ट्रेड्स सुरू करणार!

या धोरणानुसार उत्पादनाभिमुख प्रशिक्षण (PCMC ITI) योजनेंतर्गत विविध ट्रेड्स सुरु करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे.  यामध्ये ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, शिवणक्लास, सर्फेस ओर्नामेंटेशन टेक्निक्ससारख्या ट्रेड्सचा समावेश आहे. या ट्रेड्समध्ये  गणवेष तयार करणे, डांगरी तयार करणे, खिडक्या/ दरवाजांचे पडदे तयार करणे, कोच कव्हर, कपड्यांना शिलाई करणे, शिलाईची सर्व प्रकारची कामे असे कामाचे स्वरूप असणार आहे. मेकॅनिक अॅग्रीकल्चरल मशिनरी, मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स,  मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक ट्रॅक़्टर, मेकॅनिक टू अँड थ्री व्हीलर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, बेसिक कॉसमेटोलॉजी, रेफ्रिजरेशन  अँड एअर कंडीशनर टेक्निशियन, फाउन्ड्रीमॅन, फिटर,  मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मरीन फिटर, मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स, ऑपरेटर अॅडवान्स मशीन टूल्स, टूल्स अँड डाय मेकर,  टर्नर , अॅरोनॉटीकल स्ट्रक्चर इक़्विपमेंट फिटर, शीट मेटल वर्कर,  वेल्डर, इलेक्ट्रोप्लेटर,  लॅब्रोटरी असिस्टंट, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, कारपेंटर , इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन, सर्वेअर, पेंटर, इलेक्टॉनिक्स मेकॅनिक, बेकर, फूड प्रोडक्शन,  फ्रुट अँड व्हेजिटेबल्स प्रोसेसिंग, फिजिओथेरपी टेक्निशियन, कंप्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, कंप्युटर ऑपरेटर अँड प्रोगामिंग असिस्टंट, इन्फोर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मॅनेजमेंट, मल्टीमिडीया, अॅनिमेशन अँड स्पेशल इफेक्ट्स, डिजिटल फोटोग्राफर, सेक्रेटेरियल प्रॅक्टीस (इंग्रजी), स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट(इंग्रजी), एससीव्हीटी- स्टेनोग्राफी (मराठी), प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, लिफ्ट मेकॅनिक,  रबर टेक्निशियन, फायर टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीयल सेफ्टी मॅनेजमेंट, टेक्सटाईल मॅनेजमेंट, स्पिनिंग टेक्निशियन,   ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल, डेंटल लॅब्रोटरी इक़्विपमेंट टेक्निशियन, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, फ्रंट ऑफिस असिस्टंट, हॉस्पिटल हाउसकिपिंग, हाउसकिपर आदी अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.

Symbiosis : सिंबायोसिसतर्फे ‘इमर्जिंग डिजिटल मीडिया लँडस्केप – 2022’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

या उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना राबविण्याकरीता धोरण निश्चित करताना  मार्गदर्शक सूचना, उत्पादन प्रक्रियेत भाग घेणाऱ्या कर्मचारी आणि प्रशिक्षाणार्थ्यांच्या मानधनाची रचना तसेच   वस्तूची किंमत, मशिनचा प्रतितास खर्च, मजूरीचा प्रतितास दर आदींची परिगणना करण्याची पध्दती निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.