PCMC News : स्थळदर्शक आणि मार्गदर्शक फलक लावा, नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी स्थळदर्शक आणि मार्गदर्शक फलक लावावेत, शहर परिसरात वेळोवेळी किटकनाशक फवारणी करण्यात यावी (PCMC News) अशा विविध मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या.

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत 70 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या.  यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 12, 16, 3, 7, 4, 3, 15 आणि 10 नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.

जनसंवाद सभा ही नागरिक आणि महापालिका यांच्यातील समन्वय ठरत असून विविध प्रश्न, सूचना, तक्रारींच्या माध्यमातून महापालिकेची ध्येय धोरणे, निर्णयांमध्ये नागरी सहभाग वाढवण्यासाठी देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. नागरिकांनी घेतलेला सक्रीय सहभाग, अनुभव, जाणीवा यांचा शहराच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा वाटा आहे. या शहराच्या विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी प्रत्येकाचे निरंतर योगदान आवश्यक असून त्यातूनच शहराचा नावलौकिक वाढणार आहे.  सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण देखील नागरी सहभागामुळे यशस्वी होणार असून यामध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Chinchwad News : उपप्रचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे यांना “राणी लक्ष्मीबाई पुरस्कार

अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे  सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी,  समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर,  आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन  या विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा. उद्यानात धुम्रपान तसेच  रस्त्यांवर किंवा इतरत्र अस्वच्छता  करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या भागात जलवाहिन्या टाकण्यात याव्यात, अनधिकृत बांधकामे तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी,  रस्त्यावरील बेवारस वाहने तसेच अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावीत, फुटलेल्या मलवाहिन्या लवकर  दुरुस्त कराव्यात,  शहरामध्ये विविध ठिकाणी स्थळदर्शक आणि मार्गदर्शक फलक लावावेत, शहर परिसरात वेळोवेळी किटकनाशक फवारणी करण्यात यावी, अशा सूचनावजा तक्रारींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.