PCMC: शालेय पोषण आहारात आळ्या; स्वयंरोजगार संस्थेचे काम काढले, काळ्या यादीतही टाकले

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या (PCMC) 13 शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेकडून देण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा, खाण्यास अयोग्य असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास व आरोग्यास हानी पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार लेखी, तोंडी स्वरुपात कळवूनही पोषण आहारामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याचा ठपका ठेवत या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले. संस्थेकडील शालेय पोषण आहाराचे काम काढून इस्कॉनच्या अन्नामृत फौऊंडेशनला देण्यात आले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला.

महापालिका शाळेतील पहिली ते आठवीच्या (PCMC) विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला 6 ऑगस्ट 2022 रोजी काम दिले होते. पालिकेच्या 13 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषणाचे काम या संस्थेला दिले होते. चिंचवड स्टेशन येथील फकीरभाई पानसरे उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांनी 18, 24 ऑगस्ट 2022 आणि महात्मा ज्योतिबा फुले मुलांच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी 5 ऑगस्ट 2022 रोजी या संस्थेकडून पुरवठा करण्यात असलेल्या खिचडीचा निकृष्ट दर्जा, सकस सुका खाऊ नियमित पुरवठा होत नसल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या संस्थेस 24 ऑगस्ट 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. पण, संस्थेने नोटीसीचा खुलासा मुदतीत सादर केला नाही.

Vadgaon Maval : एल अँड टी कंपनीतील कामगारांचा वाद चिघळला; तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा आमदार शेळके यांचा इशारा

माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनीही वाकड येथील कै. मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळेमध्ये संस्थेकडून पुरविण्यात येत असलेल्या आहाराचा दर्जा निकृष्ट असून विद्यार्थी खात नसल्याची तक्रार केली होती. तसेच, पूर्वीचा इस्कॉन अन्नामृतचा पोषण आहार सुरु करण्याबाबत कळविले. मोहनगर, वाकड शाळेच्या मुख्याध्यापकांनीही संस्थेबाबत तक्रार केली होती. कामकाजात सुधारणा होत नसल्याने संस्थेला पुन्हा 19 सप्टेंबर 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. परंतु, याहीही नोटिसीचा खुलासा मुदतीत केला नाही. वाकड येथील प्राथिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी या संस्थेकडून पुरवठा होत असलेल्या भातात काचेचा, प्लास्टिकचा तुकडा, आळ्या, केस सापडत असल्याबाबत कळविले. अनेक शाळांनीही तक्रारी केल्या. त्यामुळे या संस्थेला 12 ऑक्टोबर 2022 रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजाविली. त्याचाही खुलासा मुदतीत सादर केला नाही. 22 नोव्हेंबर रोजी खुलासा करत शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांना भेटून यापुढे अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही अशी हमी संस्थेने दिली.

काळभोरनगर येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी 15 नोव्हेंबर रोजी पुरवठा केलेल्या खिचडीमध्ये आळी सापडल्याबाबत कळविले. त्यामुळे संस्थेकडून निकृष्ट दर्जाच्या व आळीयुक्त पोषण आहाराचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संस्थेबाबत (PCMC) येणा-या तक्रारी, असमाधानकारक खुलासा या बाबी विचारात घेता संस्थेमार्फत पुरवठा करण्यात येत असलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा, खाण्यास अयोग्य असलेला आहार दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास, आरोग्यास हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार लेखी, तोंडी स्वरुपात कळवूनही पोषण आहारामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला दिलेले पोषण आहार पुरवठ्याचे कामकाज काढून घेण्यात आले. या संस्थेस भविष्यात आहार पुरवठाबाबत निविदा भरण्यास प्रतिबंध करत काळ्या यादीतही टाकण्यात आले. शालेय पोषण आहाराचे काम इस्कॉनच्या अन्नामृत फौऊंडेशनला दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.