PCMC : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे काम आता  एजंटमार्फत

एमपीसी न्यूज – महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (PCMC )मध्यस्थाची नेमणूक केली जाणार आहे. त्याबाबतची निविदा लवकरच  प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

 

राज्यातील सर्वच नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना खुली करण्याचा निर्णय 23 मे 2020 रोजी आरोग्य खात्याने घेतला होता. कोरोना महामारीच्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळाला. कोरोना काळात गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात दीड वर्षात एक हजार 112 कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते.

 

 

2020 व 2021 या कालावधीत या योजनेच्या माध्यमातून सुमारे चार हजार 442 जणांना आर्थिक दिलासा मिळाला होता. या योजनेचे सर्व कामकाज कोरोना काळापासून वायसीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पडले होते. रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर, मानधनावरील कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. आता या योजनेच्या कागदपत्रांच्या कामकाजासाठी महापालिकेकडून मध्यस्थाची नेमणूक केली जाणार आहे. याबाबतची  निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

Maharshtra News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग

 

या योजनेत कान, नाक, घसा, कर्करोग, रेडीओथेरपी, त्वचा प्रत्यारोपण, जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखीम देखभाल, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग, पोट व जठार, कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक, बालरोग, प्रजनन व मूत्र रोग, मज्जातंतू विकृती, जनरल मेडिसिन, बालरोग वैद्यकीय, हृदयरोग, नेफ्रोलोजी, न्युरोलोजी, पल्मोनोलोजी, चर्मरोग, रोमेटोलोजी, इंडोक्रायनोलोजी, मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी, इंटरवेन्शनल रेडीओलोजी अशा 1 हजार 34 प्रकारांच्या सर्जरी केल्या जातात.

 

 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी लागते. त्यासाठी मध्यस्थ (PCMC )नेमला जाणार आहे. त्याची निविदा तयार असून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. या योजनेचा जेवढ्या रुग्णांना लाभ होईल, तेवढे महापालिकेचे उत्पन्न वाढते. शासनाकडून महापालिकेला पैसे मिळतील, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.