Pimpri: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रबोधनातून योगदान द्यावे – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – सामाजिक सलोखा राखण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे बिजारोपण सर्वसामान्य नागरीकांमध्ये रुजविले. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेऊन आज प्रत्येकाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेऊन प्रबोधनाचा कृतीशील कार्यक्रम हाती घेऊन सद्य परिस्थितीत आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आज (गुरुवारी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, विद्युत विभागाचे संतोष जाधव, महापौर कक्षाचे संतोष जाधव आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून गावाच्या विकासाकरिता लागणार्‍या साधनांचे वर्णन केले आहे. भारत छोडो आंदोलनात त्यांनी हिरीरिने सहभाग घेतला. ब्रिटीशांच्या अमानवीय मुस्कटदाबीचा त्यांनी प्रखर विरोध केला. सक्रिय सहभागातून समाजोपयोगी कामे केली. अंधश्रद्धेवर परखड टीका करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याकरिता भक्ति आणि कर्माला एकमेकांशी जोडण्याचे अवघड कार्य करून दाखविले.

त्यांनी लिहलेल्या “राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या” या त्यांच्या कवितेतून आपणास जगण्याचा योग्य दिशेचा प्रत्यय येतो. गरिबीतही आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र त्यांनी आपल्या लिखाणातून समाजासमोर मांडला. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूंचा फैलाव होत असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. अशावेळी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून शहराचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी कार्यरत राहावे असे, आवाहन महापौर ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.