Pimpri: महापौर, स्थायी समिती सभापती पिंपरीत; विरोधी पक्षनेता ‘बार्सिलोनात’ !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे महापौर, स्थायी समिती सभापती शहरात तर, विरोधी पक्षनेते, मनसेचे गटनेते परदेश दौ-यावर गेले आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे विरोधी चित्र निर्माण झाले आहे. दौ-याला विरोध करणारे विरोधकच दौ-यात सहभागी होत असल्याने विरोधी पक्षांच्या भुमिकेबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

स्पेन देशातील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जगातील शहरांच्या विकासासाठी भविष्यकालीन दुष्टीकोन, ध्येय ठरवून जगातील शहरे विकास करणे. शहर राहण्यायोग्य बनवणे. यावर मंथन होणार आहे. 400 तज्ज्ञ चर्चासत्रे, परिसंवादाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

या परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ‘रिप्रेझेंटेटिव्ह स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेस’ यांच्याकडून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालकांना मिळाले होते. तथापि, या दौ-यात स्मार्ट सिटीचे संचालक तथा महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड सहभागी होणार नाहीत. तर, स्मार्ट सिटीचे संचालक असलेले सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि सह शहर अभियंता राजन पाटील दौ-यात सहभागी झाले आहेत.

आयुक्त हर्डीकर आणि सह शहर अभियंता पाटील दोघे दोनदिवस अगोदर बार्सिलोनात पोहचले. तर, उर्वरित संचालकांनी मध्यरात्री बार्सिलोनाकडे ‘टेकऑफ’ केले आहे. हा परदेश दौरा स्मार्ट सिटीच्या संचालकच आहे. परंतु, दौ-याला येणारा 20 लाख 21 हजार रुपयांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जात आहे. दरम्यान, दौ-याला सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी विरोध दर्शविला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.