Mother Safe Campaign : शहरात ‘माता सुरक्षित’ अभियान  

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षे वयोगटावरील सर्व महिला माता, गर्भवती यांच्या सर्वांगिण तपासणीसाठी नवरात्र उत्सवात ‘माता सुरक्षित तर, घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.(Mother Safe Campaign) या मोहिमेचा प्रारंभ 27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालय येथे होणार आहे.

राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी हे खास अभियान राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित”  हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. त्याअनुशंगानेच पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत रूग्णालयांमध्येही हे अभियान राबविले जाणार आहे.

या मोहिमेत महापालिका रुग्णालये, दवाखान्यांमध्ये कार्यरत आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका इत्यादींमार्फत घरोघरी माहिती देण्यात येणार आहे. या निमित्ताने पालिका कार्यक्षेत्रातील 18 वर्षांवरील युवती, गर्भवती मातांची तपासणी आणि शिबिर होणार आहे. आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

उपक्रमात महापालिका रुग्णालय स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील. आजारी महिलांना आवश्यकतेनुसार उपचार देतील. (Mother Safe Campaign) तसेच प्रत्येक रुग्णालय झोनअंतर्गत तपासणी शिबिरे घेण्यात येणार असून, आजारी माता व महिलांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात येईल.

नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून, सोनोग्राफी तपासणी आणि कुटुंबकल्याणबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे.(Mother Safe Campaign) या अभियानांतर्गत 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रम आणि शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.