PCMC News : विभागप्रमुखांनो! स्थायी, ‘जीबी’च्या मान्यतेसाठीचे विषय ‘या’ ‘फॉरमॅट’मध्ये पाठवा; अन्यथा…

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC News) विविध विभागप्रमुखांनी स्थायी समिती, सर्वसाधारण सभा जीबीच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव पाठविण्याकरिताचा नमुना (फॉरमॅट) नगरसचिव विभागाने तयार केला आहे. त्यानुसार निविदा प्रसिद्धीपासून ते दर स्वीकृतीबाबत विभागाच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायसह संपूर्ण माहिती विषयपत्रावर द्यावी लागणार आहे. विषयाचा आवश्यक तो आशय, तपशील सविस्तर नमूद करुनच विषयपत्र मान्यतेसाठी सादर करावे. या ‘फॉरमॅट’मध्ये नसलेले विषयपत्र स्वीकारण्यात येणार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी परिपत्रकाद्वारे विभागप्रमुखांना कळविले आहे.

स्थायी समिती आणि सर्वसाधारण समितीच्या मंजुरीसाठी येणा-या विषयपत्रावर संपूर्ण माहिती दिली जात नव्हती. आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती, सर्वसाधरण समितीकडे मान्यतेसाठी आलेले आणि अर्धवट माहिती असलेले 8 विषय बाजूला ठेवले. सविस्तर माहितीसह फेरसादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगरसचिव विभागाने विषयपत्र सादर करण्याचा फॉरमॅट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसारच आता विभागप्रमुखांना विषय सादर करावे लागणार आहेत.

विभागप्रमुखांनी विषय, प्रस्ताव स्थायी समिती, सर्वसाधारण (PCMC News) सभेकडे मान्यतेसाठी पाठविताना विभागाचे नाव, विषयाचा प्रकार (मान्यता, अवलोकनार्थ, धोरण), कामाचे-योजनेचे नाव, कामाचा कालावधी, उपलब्ध तरतूदीची रक्कम, महापालिका सभा ठराव क्रमांक, दिनांक, प्रशासकीय मान्यता, निविदा रक्कम, निविदेचा प्रकार, निविदेमधील अटी व शर्तीसह संपूर्ण माहिती द्यावी. तसेच निविदा प्रसिद्धी दिनांक, निविदा स्वीकृती कालावधी, विहित कालावधीत सहभागी निविदाकारांची संख्या, एकूण पात्र निविदा, निविदा प्रसिद्धीसाठी शासन निर्णयानुसार विहित कालावधी देण्यात आला होता काय? (होय, नाही)

Housing Society : मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांच्या फेडरेशन्ससोबत पुढच्या रविवारी अडचणी जाणून घेण्यासाठी घेणार कार्यशाळा

निविदापूर्व सभा (प्री-बीड) मिटींग दिनांक, त्याचा सभावृत्तांत अपलोड केल्याचा दिनांक, निविदेस किती वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्याचा कालावधी, निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक, वित्तीय लिफाफा उघडल्याचा दिनांक, एकूण प्राप्त निविदाधारकांची संख्या, विभागाच्या अभिप्रायाप्रमाणे एकूण पात्र, अपात्र निविधारकांची संख्या, लघुत्तम निविदा दर सादर केलेल्या कंत्राटदाराचे नाव व दर, तुलनात्म तत्का, निविदा दर 10 टक्क्यांपेक्षा अधिक दराने कमी आलेल्या निविदा कमी दराबाबत अतिरिक्त सुरक्षा अनाम रक्कम व ती सादर केल्याचा दिनांक, कंत्राटदाराचा अंतिम दर, किंमत व निविदेच्या किंमतीवर टक्केवारी, तसेच अद्ययावत किंमतीच्या तुलनेत अंतिम दराची टक्केवारी, निविदा उणे दराची असल्याचे उणे दराच्या निविदेबाबत कंत्राटदाराने स्पष्टीकरण सादर केल्याचा तपशिल, दर स्वीकृतीबाबतचा विभागाचा स्वयंस्पष्ट अभिप्राय विषय पत्रावर देण्यात यावा. या ‘फॉरमॅट’मध्ये विषय दिले तरच स्वीकारले जातील. अन्यथा विषयपत्र स्वीकारण्यात येणार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव जगताप यांनी विभागप्रमुखांना कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.