PCMC News: शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई; 338 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC News) शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते आणि मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यात येणार आहेत. चार वेगवेगळ्या ठेकेदारांकडून ही कामे करुन घेण्यात येणार आहेत. या कामासाठी 338 कोटी 47 लाख रुपयांचा खर्च येणार असून हे काम सात वर्षांसाठी असणार आहे. इंधन दरात वाढ झाल्यास महापालिका वाढीव रक्कम ठेकेदारांना अदा करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (मंगळवारी) मान्यता दिली.

महापालिकेमार्फत शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे कामकाज करण्यात येते. निविदा प्रक्रीयेद्वारे डी. एम. एंटरप्रायजेस आणि बी.व्ही.जी. इंडिया या दोन संस्थांना दिले होते. त्यांची मुदत संपल्यानंतर 2020 मध्ये शहरातील 18 मीटर व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामकाजासाठी पॅकेज निहाय दर मागविण्यात आले होते. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग करून चार पॅकेजमध्ये हे काम केले जाणार आहे. चार पॅकेजमध्ये ही निविदा होती.

दक्षिण भागासाठी 331 किलोमीटर अंतराचे आणि उत्तर भागासाठी 339.15 किलोमीटर अंतराचे मोठे रस्ते आहेत. त्यामध्ये शहरातील महामार्ग, बीआरटीएस मार्ग व 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते तसेच मंडई व इतर मोकळ्या जागाचा समावेश आहे. प्रत्येक भागासाठी विविध प्रकारचे प्रत्येकी 16 वाहने आणि प्रत्येकी 191 चालक, ऑपरेटर, सफाई कामगार आणि मजूर नेमले जाणार आहेत. या सात वर्षांच्या कामासाठी एकूण 328 कोटी 95 लाख खर्च अपेक्षित धरणात आला. मात्र, तीन पॅकेजमध्ये जादा दर आल्याने यांत्रिकी साफसफाईवर 337 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. एवढेच नव्हे तर इंधन दरात वाढ झाल्यास महापालिका वाढीव रक्कम ठेकेदारांना अदा करणार आहे.

शहरातील 18 मीटर व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी 19 जुलै 2022 रोजी चार पॅकेजमध्ये निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा स्वीकारण्याचा कालावधी 17 ऑगस्ट 2022 पर्यंत होता. पॅकेज क्रमांक एकसाठी 80 कोटी 95 लाखांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यात तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी मे. इनोव्हेटीव्ह क्लिनिंग सिस्टीम या ठेकेदाराने प्रति किलोमीटर प्रतिदिन 1 हजार 680 रुपये म्हणजे निविदा रकमेपेक्षा 2.55 टक्के कमी दर दिला. त्यानुसार त्यांच्याकडून काम करुन घेण्यात येणार (PCMC News) आहे.

पॅकेज क्रमांक दोनसाठी 82 कोटी 11 लाख रुपयांची निविदा होती. त्यातही तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यात लायन सर्विसेस या ठेकेदाराने प्रति किलोमीटर प्रतिदिन 1 हजार 780 रुपयांचा दर दिला. या ठेकेदाराकडून 85 कोटी 27 लाख रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे.

पॅकेज तीनसाठी 82 कोटी 71 लाख रुपयांची निविदा होती. त्यात तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी मे. भुमीका ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराने प्रति किलोमीटर प्रतिदिन 1 हजार 770 रुपयांचा दर दिला. या ठेकेदाराकडून 85 कोटी 81 लाख रुपयांमध्ये काम करुन घेतले जाणार आहे. तर, पॅकेज चारसाठी 83 कोटी 18 लाखांची निविदा होती. यातही तीन ठेकेदारांच्या निविदा आल्या. त्यात मे. अॅटोनी वेस्ट हॅन्डलींग सेल लिमीटेड या ठेकेदाराने प्रति किलोमीटर प्रतिदिन 1 हजार 770 रुपयांचा दर दिला. त्यांच्याकडून 86 कोटी 44 लाख रुपयांत काम करुन घेतले जाणार आहे. या चारही (PCMC News) ठेकेदारांकडून 338 कोटी 47 लाख रुपयांमध्ये काम करुन घेतले जाणार आहे. या प्रस्तावाला आयुक्त सिंह यांनी आज मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.