PCMC News : मलनि:सारण प्रकल्प, सांडपाणी, घनकच-याचे व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – गृहप्रकल्प उभारताना तसेच (PCMC News) बांधकाम करताना मलनि:सारण प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, बांधकाम राडारोडा आणि घनकच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक तसेच विकसकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नियोजन करावे, अशी सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

मलनि:सारण प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, बांधकाम राडारोडा आणि घनकच-याचे व्यवस्थापन आदी विषयाबाबत माहिती देण्यासाठी क्रेडाईच्या प्रतिनिधींसमवेत चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये आज (बुधवारी) चर्चात्मक संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता रामदास तांबे, संजय कुलकर्णी, उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, महापालिकेच्या विविध विभागांचे अभियंता, क्रेडाईचे अध्यक्ष अनिल फरांदे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे प्रमुख नंदू घाटे यांच्यासह शहरातील विविध बांधकाम व्यावसायिक आणि विकसक उपस्थित होते.

Talegaon Dabhade : दिगंबर भेगडे यांची अपूर्ण कामे आम्ही पूर्ण करणार

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, दैनंदिन 100 किलो पेक्षा अधिक निर्माण होणा-या ओल्या कच-याचे व्यवस्थापन संबंधित सोसायट्यांनी करण्याची सूचना महापालिकेच्यावतीने सातत्याने देण्यात येत आहे. भविष्यकाळाचा विचार करता कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करणे काळाची गरज आहे. ज्या सोसायट्यांमध्ये जागा उपलब्ध आहे, तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कंम्पोस्ट खत निर्मिती प्रकल्पासारखे उपक्रम राबवून निर्माण होणारा कचरा तेथेच जिरवावा, यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा. सोसायटीधारकांना प्रकल्प कार्यान्वयन करताना उद्भवणा-या अडचणी सोडवण्यासाठी महापालिका मार्गदर्शन करेल. पुढील 15 वर्षांचा विचार करून शहराला पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. पाणी समस्या सोडवण्यासाठी पाण्याच्या पुनर्वापराचा प्राधान्याने विचार करणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या निकषाचे पालन करून बांधकाम व्यावसायिक (PCMC News) तसेच विकसकांनी एसटीपी प्रकल्प उभारला पाहिजे, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

घनकचरा, बांधकाम राडारोडा व्यवस्थापन, हरित गृह प्रकल्प याबद्दल देखील त्यांनी सूचना केल्या. बांधकाम राडारोडा व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने मोशी येथे प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. मात्र येथे अपेक्षित प्रमाणात बांधकाम राडारोडा संकलित होत नाही. बरेच लोक नदीपात्राजवळ असा कचरा भराव म्हणून टाकतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका संभवतो. अशा लोकांवर महापालिका कारवाई करत आहे. बांधकाम राडारोडा गोळा करण्यासाठी महापालिकेने सेवा सुरु केली असून त्या सेवेचा फायदा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी यावेळी केले. बांधकामाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे मनुष्यबळ काम करत असते, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिले पाहिजे. शिवाय या कामगारांचा अपघात विमा काढला पाहिजे, अशा सूचना देखील आयुक्त सिंह यांनी बांधकाम व्यावसायिकांना केल्या.

आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी सोसायटीमधील घनकचरा व्यवस्थापन आणि कम्पोस्टिंग प्रकल्प आणि विविध शासननिर्णयाबद्दल तर पर्यावरण आणि अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी बांधकाम राडारोडा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

पर्यावरण हा महत्वाचा भाग असून त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मलनि:सारण प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, बांधकाम राडारोडा आणि घनकच-याचे व्यवस्थापन करावे, यासाठी महापालिका आवाहन करीत आहे. याबाबत असलेले नियम, कायदे आणि त्याचे फायदे याबाबत बांधकाम व्यावसायिक आणि विकसक यांना महापालिका माहिती देत आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत क्रेडाई यात सहभागी होत असून सर्व बांधकाम व्यावसायिक आणि विकसकांनी देखील सहभाग घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष अनिल फरांदे यांनी केली. काही खाजगी कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून घनकचरा व्यवस्थापन कसे करावे याबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती यावेळी सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अभियंता मकरंद निकम यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पौर्णिमा भोर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.