PCMC News: पालिकेच्या 13 मजली इमारतीसाठी 5 कंत्राटदारांची निविदा; 3 अपात्र तर 2 पात्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC News) प्रशासकीय कामकाजासाठी इमारत उभारण्याकरिता प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेत 5 कंत्राटदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 3 कंत्राटदार अपात्र ठरले असून केएमव्ही प्रोजेक्‍ट हैदराबाद आणि बी.जी शिर्के या 2 कंत्राटदारांची निविदा पात्र झाली आहे. केएमव्ही प्रोजेक्‍ट हैदराबाद या कंत्राटदाराने 8.50 टक्के कमी दराने निविदा सादर केल्याने या कंत्रादारास इमारत बांधण्याचे काम दिले जाण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड, ऑटो क्‍लस्टर समोरील सात एकर जागेवर पर्यावरणपूरक 13 मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 312 कोटी 20 लाख 32 हजार 838 रुपये खर्चाची निविदा मे महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने तीनवेळा मुदतवाढ दिली होती. दिलेल्या मुदतीत 5 कंत्राटदारांनी निविदा सादर केली. पिंपरी येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. या चार मजली इमारतीचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते 13 मार्च 1987 रोजी उद्‌घाटन झाले होते. तीन मजल्यावर अधिकाऱ्यांची दालने तर, एका मजल्यावर पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. त्यानंतर महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले.

सध्या ही जागा अपुरी पडत आहे. अनेक विभागांची कार्यालये (PCMC News) मुख्यालयातून इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केली आहेत. पालिकेतील अधिकारी, नगरसेवकांची वाहने पार्क करण्यासाठी वाहनतळाची जागा अपुरी पडते. महापालिकेत नोकर भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असून ही भरती झाल्यास जागेची कमरता भासणार आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. वास्तुविशारद लॅण्डमार्क डिझाइन ग्रुप यांनी 17 डिसेंबर 2019 रोजी इमारतीचा विविध पर्यायांतील आराखडा सादर केला होता. 24 हजार 544 चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर त्यांनी नऊ मजली इमारतीचा आराखडा तयार केला होता. भाजपच्या सत्ताकाळात साडेचार एकरामध्ये इमारतीचे बांधकाम करण्याकामी 200 कोटींचा खर्च अपेक्षित धरला होता. परंतु, त्यामध्ये वाढ करीत खर्च 299 कोटी रुपयांवर पोहोचला. नऊ मजली इमारत बांधण्यासाठी 246 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, काही कारणास्तव ही निविदा प्रक्रिया रद्द झाली होती.

त्यानंतर तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यकाळात म्हणजे मे महिन्यात पालिकेच्या इमारतीसाठी नव्याने निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने 2 ते 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली. दिलेल्या मुदतीत 5 कंत्राटदारांनी निविदा भरली. 3 कंत्राटदार अपात्र झाले असून केएमव्ही प्रोजेक्‍ट हैदराबाद आणि बी.जी शिर्के या 2 कंत्राटरांची निविदा पात्र झाली. केएमव्ही प्रोजेक्‍ट हैदराबाद या कंत्राटदाराने 8.50 टक्के कमी म्हणजे सुमारे 285 कोटी 48 लाख कमी दराने सादर केली आहे. तसेच भरलेल्या निविदेपेक्षा कंत्राटदार आणखी काही रक्कम कमी करतो का? यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करणार आहे.

प्रशस्त इमारत अन्‌ हेलिपॅड – PCMC News

महापालिकेची चिंचवड स्टेशन या ठिकाणी 35 एकर जागा आहे. त्यापैकी 7 एकर जागेत 13 मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्याचे नियोजन आहे. भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करून या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध विभागासह पदाधिकाऱ्यांची दालने असतील. प्रशस्त सभागृह, मीटिंग हॉल, कॅण्टीन, स्वच्छतागृह आणि इतर सोयी असतील. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. पाच मजली स्वतंत्र इमारतीमध्ये वाहनतळ असणार आहे. त्यात 500 मोटारी आणि दीड हजार दुचाकी पार्क करता येणार आहेत. तर, महापालिका सभागृहात 300 नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असणार आहे. इमारतीच्या गच्चीवर हेलिपॅड असणार आहे.

ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.