PCMC Police : स्थानिक पोलीस दखल घेत नाहीत, तर थेट पोलीस आयुक्तांच्या व्हाट्सअपवर करा तक्रार

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे प्रभारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड (PCMC Police) शहरात नव्या पोलीस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर आयुक्तांनी लगेचच दुसरा बदल केला आहे. पहिल्याच दिवशी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केल्यानंतर आता स्थानिक पोलिसांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून न घेतल्यास, नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांना त्यांची तक्रार व्हाट्सअप करावी, असे आवाहन करत पोलीस आयुक्तांनी व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे.
अंकुश शिंदे यांची 20 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदावर बदली झाली. त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. पहिल्याच दिवशी आयुक्त अंकुश शिंदे यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केले. त्यांनतर पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या कामगिरीचा आढावा घेतला.

PCMC Police

 

आयुक्तांनी सर्व पोलीस अधिकारी (PCMC Police) आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. यापुढे पोलीस ठाणे अथवा विविध शाखांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारल्यास संबंधित प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी दिली. आयुक्तांच्या या आदेशाने पिंपरी चिंचवड पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

 

थेट व्हाट्सअपवर तक्रार – 

आता पोलीस आयुक्तांनी व्हाट्सअप क्रमांक जाहीर केला आहे. हा क्रमांक सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आला आहे. ‘पोलीस स्टेशन येथे जर आपली तक्रार घेतली नाही, तर सदरची तक्रार 9307945182 या नंबरवर व्हाट्सअपद्वारे करावी,’ असे पोलीस ठाण्यांत लावलेल्या फलकांवर नमूद केले आहे.

 

Chinchwad Police Ankush shinde
स्थानिक पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही, तर नागरिकांना थेट पोलीस आयुक्त कार्यालयाकडे व्हाट्सअपद्वारे तक्रार करता येणार आहे. या तक्रारींची दखल सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. तक्रारीची शहनिशा करून स्थानिक पोलिसांना विचारणा होणार आहे. त्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त कार्यालयाकडून होणार आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (PCMC Police) यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे प्रभारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराच्या तक्रारींचे निराकरण करण्यावर भर दिला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.