PCMC : कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांचा वाढता आलेख

एमपीसी न्यूज –  गतवर्षी कर संकलन व कर आकारणी विभागाच्या ( PCMC ) वतीने राबविलेल्या विविध उपक्रमांचा 2023-24 या चालू आर्थिक वर्षातही मोठा लाभ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच सुरुवातीच्या दोन महिन्यांत तब्बल 161 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. त्यामुळे कर संकलन विभागाची एक हजार कोटींच्या दिशेने घौडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच विविध कर सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांनी 30 जून पूर्वी कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

गतवर्षी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने वसुलीसाठी राबवलेली जप्ती मोहीम, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध, नळ कनेक्शन बंद करणे, मीम्स स्पर्धा, विविध सवलती, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. याचाच परिणाम म्हणून गतवर्षी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच 817 कोटींचा कर वसूल झाला.

शहरात मालमत्तांची संख्या सुमारे सहा लाख असताना यामधील अनेक मालमत्ता धारक कर भरत नसल्याचे गेल्या काही वर्षांत चित्र दिसत होते. मात्र, गेल्या दिड वर्षांपासून   कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने सुरू असल्याचे विविध उपक्रम, जनजागृती, मालमत्ता धारकांना घरपोच बिले, घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कर कक्षेत आणि कर भरणाऱ्या नागरिकांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.

MPC News Podcast 29 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. शहरात पाच लाख 97 हजार 785 मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने 17 विभागीय कार्यालये, ऑनलाईन, विविध ॲपच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच सुरूवातीच्या दोन महिन्यांत तब्बल 1 लाख 33 हजार 125 जणांनी 161 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

कामगार नगरी, औद्योगिक नगरी, बेस्ट सिटीकडून स्मार्ट सिटी, मेट्रो सिटीकडे घौडदौड करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. शहर चारही बाजूने झपाट्याने विकसित होत आहे. तसेच महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असतानाच कर संकलन विभागाच्या वतीने जास्तीत-जास्त कर वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश येत असून दिवसेंदिवस कर भरणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे.

वर्ष    कर भरणाऱ्यांची संख्या रक्कम
2018-19 : 45,161, 48,17,20000
2019-20 : 57,955, 62,69,9000
2020-21: 21,710, 21,23,53,526
2021-22 : 57,948, 62,59,6644
2022-23 : 77,803, 97,95,30042
2023-24 : 133,125, 161,32,64,741 (26 मे अखेर)

सिद्धी प्रकल्पाअंतर्गत 4 लाख 80 हजार बिलांचे वाटप

महापालिकेच्या वतीने यंदा प्रथमच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटांना मालमत्ता कराची बिले वाटप करण्याचे काम देण्यात आले आहे. या महिलांनी आत्तापर्यंत तब्बल 4 लाख 80 हजार मालमत्ता कराची बिले घरपोच केली आहेत. उर्वरित बिले येत्या 10 ते 12 दिवसांत वाटप केले जातील, असा विश्वास कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

22 हजार थकबाकीदारांना जप्ती पूर्व नोटीसा

सिद्धी प्रकल्पाअंतर्गत मालमत्ता करांच्या बिलाचे वाटप होत असतानाच 31 मार्च 2023 अखेर 1 लाखांपेक्षा अधिक कर थकबाकी असलेल्या 22 हजार मालमत्ता धारकांना जप्ती पूर्व नोटीसा बजावल्या जात आहेत. अशा थकबाकीदारांनी लवकरात-लवकर संपूर्ण कर भरावा, अन्यथा नाईलाजाने मालमत्ता जप्त करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला ( PCMC )आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.