Pimpri News : कार्यालयीन वेळेत टाईमपास करणा-या महापालिकेच्या 104 कर्मचा-यांना ‘शो-कॉज’ नोटीस

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत दिलेल्या सवलतीच्या गैरफायदा घेणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना प्रशासन विभागाने चांगलाच दणका दिला. हजेरी पत्रकावर स्वाक्षरी न करता कार्यालयीन वेळेत बाहेर फिरणा-या तब्बल 104 कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. यामध्ये अभियंते, भांडारपाल, आरेखक, ऑपरेटर यांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ओमायक्रॉन, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत 31 जानेवारी 2022 पर्यंत सवलत देण्यात आली होती. त्याबाबतचा आदेश 11 जानेवारी रोजी काढला होता. थम्ब इम्प्रेशन नसले तरी अधिकारी, कर्मचा-यांना हजेरी पटावर नियमितपणे निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेत दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक केले होते.

पण, याचा गैरफायदा घेत कर्मचारी कार्यालयीन वेळेत बाहेर फिरत होते. कर्मचारी कॅन्टीनसह बाहेर फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यासाठी प्रशासनाने एक पथक नेमून चौकशी केली. त्यात अनेक विभागातील तब्बल 104 कर्मचा-यांनी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केली नसल्याचे आढळून आले. चौकशी समितीने ‘मस्टर’ जप्त केले. त्यावेळी 104 कर्मचा-यांची मस्टरवर स्वाक्षरी नव्हती. त्यात उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, उपलेखापाल, आरेखक, भांडारपाल, संगणक ऑपरेटर, शिपाई यांचा समाववेश आहे. या 104 कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली असून लेखी उत्तर मागितले असल्याचे प्रशासनातील अधिका-यांनी सांगितले.

थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलतीचा आदेश रद्द!

थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आलेल्या 11 जानेवारीचा आदेश रद्द करण्यात आला. महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना फेस रिडिंग मशिनद्वारे बायोमेट्रीक हजेरी नोंदविणे बंधनकारक व सक्तीचे करण्यात आले. ज्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी फेस रिडिंग उपस्थिती नोंदविणे बंधनकारक राहील.

फेसरिडींग मशीन सुस्थितीत ठेवण्याची खबरदारी माहिती व तंत्रज्ञान विभागाने घ्यावी. तथापि, महाराष्ट्र शासनाने कोरोनाबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागप्रमुख, शाखाप्रमुखांनी हे परिपत्रक आपल्या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून देण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.