Pimpri : ‘शेअर ए बायसिकल’ प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी 

एमपीसी न्यूज  – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात ‘बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे.  याअंतर्गत पिंपळे गुरव ते वाकड या बीआरटीएस मार्गालगतच्या एकूण 45 ठिकाणी ही योजना राबविली जाणार आहे. यामध्ये काही उच्चभ्रू सोसायट्यांचा देखील समावेश असणार आहे. याबाबतचा कराराला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात ‘शेअर-ए-बायसिकल’ योजना खासगी कंपन्यांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात 200 सायकल उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाल्यानंतर या योजनेतील संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘शेअर-ए-बायसिकल’ ही योजना राबविण्याच्या नियोजन असून, योजनेकरिता सायकल उपलब्ध करून देणा-या प्रायोजक कंपन्यांशी करार करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत सायकल पुरविणा-या प्रायोजक कंपन्यांशी करारनामा करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या प्रायोजक कंपन्या सायकली पुरविणार असल्या, तरी देखील दिशादर्शक फलक, स्टेशन उभारणे, रस्त्यावरील पट्टे रंगविणे यासाठी महापालिका ‘स्मार्ट सिटी’ निधीमधून खर्च करणार आहे. या कंपन्यांची सायकल चालविणा-या सायकलस्वाराचा अपघात झाल्यास अथवा काही तक्रार असल्यास त्याची पूर्णत: जबाबदारी संबंधित कंपनीची असणार आहे. हा करार पाच वर्षांसाठी असून, रात्रीच्या वेळी सायकलस्वारांनी रस्त्यात सोडून दिलेल्या सायकली परत जागेवर आणण्याची जबाबदारी कंपनीची असणार आहे. सायकलींचा होणारा वापर, वेळ व उपलब्ध होणार महसूल यांचा मासिक अहवाल महिन्याच्या 5 तारखेपर्यंत सादर करावा लागणार आहे.

नागरिकांनी कमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पिंपळे सौदागरमधील बीआरटीएस मार्गालगत महापालिका प्रशासनाने सायकल उभ्या करण्यासाठी केवळ जागा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. याशिवाय अनेक उच्चभ्रू सोसायट्यांच्या आवारात सायकली उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही बाब या सोसायट्यांच्या अखत्यारितील आहे. याकरिता प्रति तास नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, हे भाडे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. तसेच महिला, पुरुष, मुले यांना चालविण्यासाठी सोयीस्कर ठरतील, अशी सायकलची विविध मॉडेल्स उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील महिला व पुरुषांचा सहभाग वाढणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.