Pimpri : स्थायी समिती अध्यक्षपदाची उद्या निवडणूक, संतोष लोंढे यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

भाजपकडून संतोष लोंढे, राष्ट्रवादीचे पंकज भालेकर रिंगणात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या (शुक्रवारी) निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर रिंगणात आहे. स्थायी समितीत भाजपचे बहुमत असल्याने लोंढे यांची निवड निश्चित मानली जात असून उद्या त्यावर शिक्कामोर्तब होईल. बिनविरोध निवड होणार की निवडणूक होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या स्थायी समिती सभागृहात दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी (दि.2) अर्ज दाखल करण्यात आले. सत्ताधारी भाजपकडून संतोष लोंढे आणि राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. स्थायीत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपचे लोंढे यांची निवड निश्चित मानली जाते. राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचा एक असे पाचच सदस्य विरोधातील आहेत. त्यामुळे लोंढे यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.