Pimpri: महापालिकेने येस बँकेतील ‘ट्रान्झॅक्शन’ थांबवले!

बँक ऑफ बडोदामध्ये भरणा करण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज – खासगी क्षेत्रातील येस बँकवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपाने गोळा झालेले तब्बल 984 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने येस बँकेतील ‘ट्रान्झॅक्शन’ गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून थांबवले आहे. आता बँक ऑफ बडोदामध्ये मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगीतून येणा-या दैनंदिन उत्पन्नाचा भरणा करण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी वसूल केली जाते. तसेच बांधकाम परवानगीतून देखील दररोज उत्पन्न मिळते. जास्त व्याजदर मिळत असल्याने महापालिकेने येस बँकेत ऑगस्ट 2018 साली बचत खाते उघडले. तेव्हापासून महापालिकेने दैनंदिन वसूल झालेल्या पैशांचा येस बँकेत भरणा करण्यास सुरुवात केली. 18 महिन्याच्या काळात महापालिकेला 150 कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे.

येस बँकेचे कंत्राटी कर्मचारी महापालिकेच्या विभागीय करसंकलन कार्यालये, मुख्यालयातून दररोज पैसे घेऊन जात होते. महापालिकेच्या येस बँकेतील बचत खात्यात जमा केले जात होते. परंतु, येस बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने  भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी (दि.5) निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत.

पिंपरी महापालिकेचे करदात्यांचे गोळा झालेले तब्बल 984 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. महापालिकेला आता पैसे काढता येणार नाहीत. त्याचा वेतन, विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिकेने गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून येस बँकेतील भरणा बंद केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, येस बँकेच्या प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. वेतन, ठेकेदाराला देण्यासाठी पैसे लागणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे पैसे देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आजपासून मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगीतून येणा-या दैनंदिन उत्पन्नाचा भरणा बँक ऑफ बडोदा मध्ये सुरु केला आहे. बँकेच्या अधिका-यांसोबत बैठक देखील घेतली आहे. महापालिका आता नियमितपणे याच बँकेत दैनंदिन भरणा करणार असल्याची सूचना बँकेच्या अधिका-यांना दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.