Pimpri: पाच लाख नागरिकांचे सर्वेक्षण; दीड हजार नागरिक ‘होम क्वारंटाईन’

तीन पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर, 12 दिवसात नवीन पॉझिटीव्ह रुग्ण नाही

एमपीसी न्यूज – परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1498 जणांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, आज अखेर शहरातील पाच लाख  नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्या नऊ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तीन पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असून 12 दिवसात नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकुण 263 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यापैकी आज अखेर 231 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज (मंगळवारी) 23 संशयीतांना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या 244 कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. आजअखेर शहरातील पाच लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आज अखेर 1498 व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. त्या सर्वांनी किमान 14 दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे.

तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील 14 दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
https://www.pmc.gov.in/en/corona

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.