Pimpri: दुकाने उघडण्यास परवानगी पण कर संकलन कार्यालये बंद का?

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) tax collection centres not yet started, citizens demand extention of last date for various concessions in tax.

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असतानाही महापालिका प्रशासन उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही. नवीन अर्थसंकल्पीय वर्ष सुरु झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी कर भरण्याची ऑनलाईन सुविधा सुरु केली. दुसरीकडे महापालिकेने शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली मात्र कर संकलन कार्यालये बंद का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे महापालिकेला मिळणारा महसूल बुडत आहेत.

दरम्यान, महापालिकेने 31 मे पर्यंत कर भरणा-यांना विविध सवलती जाहीर केल्या होत्या. परंतु, 31 मे संपायला केवळ 15 दिवस राहिले आहेत. त्यामुळे या योजनांना महापालिकेला आता मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

राज्य सरकारकडून जीएसटीपोटी मिळणारा महसूल कमी झाला आहे. एप्रिल महिन्यात केवळ 50 कोटी रुपयेच महापालिकेला मिळाले आहेत. भविष्यातही पैसे कमी मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेचे अर्थचक्र बिघडले आहे.

त्यामुळे महापालिकेला आता उत्पन्न वाढीवर भर द्यावा लागणार आहे. मालमत्ता कर महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु, याकडे कर संकलन विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

आर्थिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटत आले आहेत. महापालिकेने आता 10 मे रोजी ऑनलाईन कर भरण्याची सुविधा सुरु केली आहे. त्यातच 16 विभागीय करसंकलन कार्यालये बंदच आहेत. त्यामुळे ज्यांना कराचा भरणा करायचा आहे. त्यांना कर भरणा करता येत नाही.

चालू आर्थिक वर्षातील दोन महिने संपत आले आहेत. तरीही, कर संकलन विभागाचे नियोजन शून्य काम सुरु आहे. कर संकलन विभागाकडून वसुलीचे ‘टार्गेट’ही पुर्ण केले जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने कोरोनाची काळजी घेण्याच्या सूचना करत शहरातील विविध दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, विभागीय करसंकलन कार्यालये बंदच आहेत. केवळ ऑनलाईन कर भरणा सुरु आहे. सर्वच नागरिक ऑनलाईन कर भरण्यास पसंती देत नाहीत.

त्यामुळे विभागीय करसंकलन कार्यालये सुरु करणे अतिशय आवश्यक आहे. जेणेकरुन महापालिका तिजोरीत महसूलही जमा होईल.

या योजनांना द्यावी लागणार मुदतवाढ!
महापालिकेने चालू आर्थिक वर्षात 31 मे 2020 अखेर थकबाकीसह संपूर्ण मिळकत कराचा एक रक्कमी 100 टक्के भरल्यानंतर भरणा दिनांकापर्यंत आकारण्यात आलेल्या महापालिका कराच्या विलंब दंड रक्कमेत 90% सवलत जाहीर केली.

परंतु, ऑनलाईन कर भरण्याचे काम प्रत्यक्षात 10 मे पासून सुरु झाले आहे. विभागीय कार्यालयेही बंदच आहेत. नागरिकांना केवळ 20 दिवसच मिळत आहेत. त्यामुळे सवलत योजनेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

याशिवाय 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 या कालावधीत मिळकत कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्य करातील सवलत योजना आहे. तसेच ज्या माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी / फक्त महिलांचे नावे असलेल्या / 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणा-या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणा-या मिळकतीस तसेच संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवा, अविवाहीत शहीद सैनिकांचे नामनिर्देशितांचे मालमत्तांधारकांच्या सवलत योजनेलाही मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.