PCMC News : थकबाकी असलेल्या निवासी सदनिकांवर टाच, एकाच दिवशी 50 सदनिका सील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांवर  जप्तीची धडक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (दि.23) रोजी एकाच दिवशी शहरातील विविध भागातील नामांकित सोसायट्यांमधील तब्बल 50 सदनिका सील करण्यात आल्या. (PCMC News) या सदनिका धारकांकडे 55 लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी थकीत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. तसेच जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 अशा 31 हजार  971 मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीसा कर आकारणी व कर संकलन विभागाने दिल्या आहेत. तसेच तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

शहरात 5 लाख 82 हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत 2 लाख 87 हजार 446 मालमत्ता धारकांनी 466 कोटी रूपये कराचा भरणा केला आहे.(PCMC News) 2022-23 या आर्थिक वर्षाचे कर आकारणी व कर संकलन विभागाने 1000 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान 85 टक्के मालमत्तांचा टॅक्स वसूल करणे आवश्यक आहे.

Chinchwad News : 26/11 हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन

याबाबत माहिती देताना सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. मात्र, शहरातील तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. वारंवार कर भरण्याचे आवाहन करून मालमत्ताधारक कर भरत नसल्याने महापालिकेला नाईलाजाने कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. बुधवारी एकाच दिवशी शहरातील नामांकित सोसायट्यांमधील 50 सदनिका सील करण्यात आल्या आहेत.

यापुढील काळातही थकबाकीदारांच्या सदनिका सील करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. त्यामुळे मालमत्ता धारकांनी थकबाकी आणि चालू वर्षाचा कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. पिंपरीतील ऍथिया, रावेतमधील पंचवटी, रेनबो, प्रोबो, वाकडमधील माॅन्ट व्हर्ट सेविल,(PCMC News) पुनावळेतील सियोना, पिंपळे-सौदागर येथील शुभश्री वुड्स, लाईफ स्टाईल, चिंचवड येथील माइंड्स्पेस रिआलिटी क्कीन्स टाऊन, तळवडेतील देवी इंद्रायणी या नामांकित गृहनिर्माण सोसायट्यांमधील सदनिका शील केल्या आहेत.

…तर जप्त केलेल्या मालमत्तांचा जाहीर लिलाव
थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त केल्यानंतर अनेक मालमत्ता धारक त्वरीत कर भरत आहेत. मात्र, मालमत्ता जप्तीनंतरही काही जण कर भरत नसल्याचे समोर आले आहे.(PCMC News) अशा मालमत्तांच्या लिलावाची कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे आणि त्याला स्थायी समितीची मान्यता पण घेण्यात आली आहे. मालमत्ता जप्त केल्यानंतर  21 दिवसांच्या आत कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे, असा इशाराही सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.