PCMC : ‘इतर मुख्य शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील तापमान कमी’

एमपीसी न्यूज – वातावरणातील वाढत्या तापमानामुळे (PCMC) सजीव सृष्टीवर परिणाम होवून शारिरीक ताण वाढतो, अस्वस्थता जाणवते. यासाठी मानवी तसेच अन्य जीवांची जपणूक करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तापमान इतर मुख्य शहरांच्या तुलनेत कमी असले तरी शहराच्या तापमानात वाढ होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स ऍन्ड एन्व्हायरोमेंटचे कार्यक्रम संचालक रजनिश सरीन यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘शहरी तापमान आणि स्वच्छ हवेबाबत उपाययोजना’ या विषयावर दिल्ली येथील ‘सेंटर फॉर सायन्स ऍन्ड एन्व्हायरोमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठीया, उप आयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रिय अधिकारी अमित पंडित, अण्णा बोदडे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विविध विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच वास्तुविशारद उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या चांगल्या राहणीमानाकरिता हवेची गुणवत्ता चांगली ठेवणे गरजेचे असून यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे 2019 रोजी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमात देशातील विविध शहरांचा समावेश असून त्यामध्ये पिंपरी चिंचवडचाही समावेश आहे.

या कार्यक्रमांतर्गत 2024 पर्यंत शहरातील हवा प्रदुषण 20 ते 30 टक्के कमी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना राबविल्या असून हवा प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सेंटर फॉर सायन्स ऍन्ड एन्व्हायरोमेंटच्या कार्यक्रम व्यवस्थापक शांभवी शुक्ला यांनी हवा प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात (PCMC) येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देताना, हिवाळ्यात हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढते त्यामुळे हिवाळ्यात हवा प्रदूषण रोखण्यासाठी जास्तीत जास्त उपाययोजना करणे गरजेचे आहे, तसेच शहरातील जुन्या डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घातली पाहिजे आणि इलेक्ट्रिक वाहनांची संख्या कशी वाढविता येईल यावर भर दिला पाहिजे.

शहरातील रस्त्यांवरील 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा कार आणि दुचाकी वाहनांनी व्यापली आहे. सायकल किंवा पादचारी मार्गांसाठी शहरांमध्ये खुप कमी जागा दिलेली असते. तसेच गाड्यांचा वापर कमी व्हावा यासाठी पार्किंगची सुविधाही बऱ्याच ठिकाणी देण्यात आलेली नाही, त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो यासाठी नागरिकांनी बस, सायकल आणि पादचारी मार्गांचा वापर केला पाहिजे जेणेकरून कोंडी दूर होऊन हवा प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. सर्वात दूषित हवा असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातीलही काही शहरांचा समावेश अलिकडे होताना दिसत आहे.

दैनंदिन हवा प्रदूषणामुळे मृत्यु होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी (PCMC) यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सेंटर फॉर सायन्स ऍन्ड एन्व्हायरोमेंटच्या मिनाक्षी सिंह यांनी बांधकाम राडारोडा आणि धूलीकण व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, बांधकाम सुरू असणाऱ्या सर्व इमारतींना व बाजूने हिरवे कापड अथवा ज्यूट शीट ताडपत्रीने झाकणे बंधनकारक आहे तसेच पाडकाम सुरू असताना बांधकाम हिरवे कापड, ज्यूट शीट कव्हर, ताडपत्रीने झाकलेली असणे गरजेचे आहे.

काम सुरू असताना त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य ने-आण करण्याच्या वेळी पाणी शिंपडले जाईल याची खात्री करायला हवी. धुळीचे कण वायु प्रदूषणास कारणीभूत ठरतील यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. असे सांगून त्यांनी बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने सर्व बाजूने झाकली जावीत जेणेकरून बांधकाम साहित्य किंवा तत्सम साहित्य वाहतूकी दरम्यान हवेत उडणार नाही. सर्व बांधकाम साईटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत जेणेकरून वाहनांचे टायर साफ केल्यानंतरच चालविले जात आहेत किंवा नाहीत तसेच ओव्हरलोड आहेत किंवा नाहीत याची खात्री करणे शक्य होईल.

Pune : शिवराज्याभिषेकासह रायगडाची कथा ऐकण्याची पुणेकरांसाठी संधी

सर्व बांधकाम साईटवर सेन्सर आधारीत वायुप्रदूषण मॉनिटर लावण्यात यावेत आणि ग्राइंडिंग, कटींग ड्रीलिंग, ट्रीमिंग इत्यादी कामे बंदीस्त भागात केली जातील तसेच काम करताना पाणी फवारणी अथवा वॉटर फॉगिंग करणेही गरजेचे आहे जेणेकरून वायू प्रदूषणास आळा बसेल, असेही सांगितले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केले तर सुत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून यासाठी देशी झाडांचे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करत असल्याचे सांगितले. तसेच 18, 24, 30 व 45 मीटरच्या रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण मोहीम राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.