Pimpri: प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका बांधणार नऊ मजली इमारत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनीजवळील आरक्षित भूखंडावर नवीन नऊ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. साडेचार एकरांमध्ये इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. पहिले दोन मजले राजकीय पदाधिकारी, सहा मजले प्रशासकीय कामकाजासाठी आणि शेवटचा नववा मजला कर्मचाऱ्यांना जेवण करण्यासाठी असणार आहे.

शहराच्या नावाची ओळख सांगण्यासाठी पिंपळ, चिंच आणि वडाचे झाडदेखील लावण्यात येणार आहे. इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून आगामी अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. प्रस्तावित नवीन इमारतीच्या कामकाजाचे आज (मंगळवारी) पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नितीन देशमुख याप्रसंगी उपस्थित होते.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीत महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. या चार मजली इमारतीचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते 13 मार्च 1987 रोजी उद्घाटन झाले होते. त्यानंतर सातत्याने महापालिका इमारतीचे विस्तारीकरण करण्यात आले. तीन मजल्यांवर अधिकाऱ्यांची दालने तर तिसऱ्या मजल्यावर पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. कार्यालये आणि दालनांसाठी जागा अपुरी पडत आहे.

अनेक कार्यालये मुख्यालयातून महापालिकेच्या इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केली आहेत. अनेक विभागांत नागरिकांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. महापालिकेत वाहनतळ देखील पुरेसे नाहीत. अधिकारी, नगरसेवकांची वाहनेच पार्क करण्यासाठी जागा अपुरी पडते. महापालिकेचा नोकर भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. नोकर भरतीला मान्यता मिळाल्यास आणि कर्मचारी भरत्यानंतर पुन्हा जागेची कमरता भासणार आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

महापालिका मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनीजवळील आरक्षित भूखंडावर नवीन नऊ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. तिथे सहा एकर जागा असून साडेचार एकरांमध्ये इमारत बांधण्यात येणार आहे. 900 चारचाकी तर 2 हजार 250 दुचाकी क्षमतेचे पार्किंग असणार आहे. प्रशासनाने चार प्रस्तावांचे सादरीकरण केले. सध्याच्या इमारतीमध्ये पदाधिकारी आणि अधिका-यांना बसावे. नवीन इमारतीमध्ये आयुक्त, प्रशासन, स्थायी समितीचे सभागृह, जुन्या इमारतीमध्ये पदाधिका-यांनी बसावे. आयुक्त प्रशासन नवीन इमारतीत असेल. अथवा पदाधिकारी, प्रशासनासह सर्वांनी नवीन इमारतीतूनच कामकाज चालवायचे, असे चार पर्याय ठेवले आहेत.

याबाबतची माहिती देताना कार्यकारी अभियंता संजय घुबे म्हणाले, ”सध्याच्या इमारतीत जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. प्रथम अंदाजपत्रक काढले जाईल. त्यानंतर निविदा प्रसिद्ध केली जाईल. सर्वांत कमी दराची निविदा स्वीकारून काम करण्यात येईल. या प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर अडीच वर्षात इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्याच्या इमारतीचे नूतनीकरण करुन पुनर्वापर केला जाईल.’

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की अनेक विभागांत नागरिकांना बसण्यासाठी जागा नसते. वाहनतळ देखील पुरेसे नाही. अधिकारी, नगरसेवकांची वाहनेच पार्क करण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे रस्त्यावर वाहने पार्क करावी लागतात. त्यासाठी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.’

लॅंडमार्क डिझाईन ग्रुप यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक

या कामाचे नकाशे तयार करुन त्यास बांधकाम परवानगी घेणे, कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, आरसीसी डिझाईन करणे, सविस्तर नकाशे तयार करणे, बांधकाम परवानगी विभागाकडून कामास पुर्णत्वाचा दाखला प्राप्त करुण घेणे. नकाशाप्रमाणे काम करुन घेण्यासाठी यापूर्वीच लॅडमार्क डिझाईन ग्रुप यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना निविदा रकमेच्या निविदा पूर्व कामासाठी 0.50 टक्के आणि 1.40 टक्के निविदा पश्चात कामासाठी अशी एकूण 1.90 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.