Pimpri: दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास पालिका देणार लाख रूपये

जागतिक अंपग दिनी योजना होणार सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अपंग व सव्यंग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी सुदृड तरूण अथवा तरूणीने दिव्यांगाशी विवाह एक लाख रूपये देण्यात येणार आहेत. एक लाख रूपयांची ‘एफडी’ संबंधित दाम्पत्याच्या नावावर बँकेत करण्यात येणार आहे. पाच वर्षानंतर ही रक्कम त्या दाम्पत्याला मिळणार आहे. 2012 नंतर विवाह केलेल्यांनाही योजना लागू होणार आहे. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून तीन डिसेंबर 2018 रोजी ही योजना सुरू केली जाणार आहे. याबाबतची माहिती नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली.

दिव्यांग कल्याण समिती आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या पदाधिका-यांबरोबर आज (शनिवारी) महापालिकेत बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य मानव कांबळे, विश्वनाथ वाघमोडे, दत्तात्रय भोसले, परशुराम बसवा, गोपाळ मळेकर आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने विविध समाज कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

या बैठकीमध्ये दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. दिव्यांगाशी सुदृड तरूण अथवा तरूणीने विवाह केल्यास महापालिकेच्या वतीने त्या दाम्पत्याच्या नावावर 1 लाखांची एफडी बँकेत करण्यात येणार आहे. पाच वर्षांनंतर ही व्याजासह रक्कम दाम्पत्याला मिळणार आहे. ही योजना 2012 नंतर विवाह केलेल्या दिव्यांगानाही लागू होणार आहे. 40 टक्यांपुढील अंपगत्व असलेल्यांसाठी ही योजना आहे. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर 2018 ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे, नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सहाय्यक आयुक्त झगडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नागरवस्ती विभागाच्या वतीने महापालिकेच्या सर्व इमारतीमध्ये दिव्यांगासाठी रॅम्प, विशेष प्रकारची शौचालये बांधण्यात येणार आहेत. जन्माला आलेल्या बालकांचे अपंगत्व निदान आणि उपचार त्वरित होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य अपंगत्वाचे निदान येईल. उपचार केले जातील. अपंगत्व येण्यापूर्वीच त्यांना मदत करणे शक्य होईल. अंगनवाडी सेविकांना प्रशिक्षित करणे. त्याचा कालबद्ध नियोजन केले जाणार आहे, असेही झगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.