Nigdi News: पाणीशुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरची खरेदी; 34 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी- सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी स्टेबल ब्लिचिंग पावडर खरेदी करण्यात येणार आहे. दोन पुरवठादारांकडून ही पावडर घेण्यात येणार आहे. यासाठी 34 लाख 57 हजार रुपये खर्च होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. त्यासाठी द्रवरूप स्वरूपातील क्लोरिन वायूचा नियमित पुरवठा करण्याची गरज भासते. जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये स्टेबल ब्लिचिंग पावडर हा घटक महत्त्वाचा असून, त्याचा पुरवठा न चुकता अखंडितपणे जलशुद्धीकरण केंद्रास होणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

या रसायनाच्या पुरवठ्यासाठी एकावेळी दोन एजन्सी महापालिकेच्या हाताशी असणे गरजेचे असते. या पावडरची खरेदी लघुत्तम दर सादर करणा-या पहिल्या ठेकेदाराकडून 60 टक्के आणि दुसऱ्या लघुत्तम दर सादर करणाऱ्या ठेकेदाराकडून 40 टक्के या प्रमाणात करण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने निविदा मागविल्या. त्यामध्ये तीन पुरवठादारांनी निविदा सादर केल्या.

त्यापैकी एस. व्ही. एस. केमिकल कॉर्पोरेशन यांनी निविदा दरापेक्षा 21.43 टक्के जादा दर सादर केला. त्यांना हा दर कमी करण्यास सांगितले. त्यांनी 9.76 टक्के जादा हा सुधारित दर सादर केला. त्यानुसार, एस. व्ही. एस. केमिकल कॉर्पोरेशनकडून एकूण परिमाणाच्या 60 टक्के परिमाणानुसार 20 लाख 74 हजार रुपयांची आणि त्याच दराने दुसऱ्या क्रमांकाचे ठेकेदार गिरिराज ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून एकूण परिमाणाच्या 40 टक्के परिमाणानुसार 13 लाख 82 हजार रुपयांची स्टेबल ब्लिचिंग पावडर खरेदी केली जाणार आहे. या खरेदीसाठी एकूण 34 लाख 57 हजार रुपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.