Pimpri News : शहरातील गावठाण भागातील नागरिकांसाठी महापालिका इलेक्ट्रिक बस खरेदी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड येथील गावठाण भागातील नागरिकांच्या दारात पीएमपीएमएलची बस येणार आहे. गावठाणातील नागरिकांना बससेवेपासून वंचित रहावे लागत असल्याने महापालिका 7 मीटर आणि 9 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बस खरेदी करुन पीएमपीएमएला संचलनासाठी देणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड आदी ठिकाणी गावठाण भाग आहे. गावठाणातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. गावठाण भाग सोडून उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची रुंदी वाढली आहे. या रस्त्यांवर वाहतूक सुरळीत राहते. परंतु, गावठाण भागातील अरुंद रस्त्यांवर नेहमीच गर्दी होते.

अरुंद रस्त्यांवर पीएमपीएमएलच्या मोठ्या 12 मीटर बस संचलन करु शकत नाहीत. त्यामुळे गावठाण भागातील नागरिकांना बससेवेपासून वंचित राहावे लागते. पर्यायाने त्यांना अन्य वाहनांचा वापर करावा लागतो. ही बाब विचारात घेऊन गावठाण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी पीएमपीएमएलच्या बसचे संचलन सुरु करणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला. या योजनेंतर्गत नवीन योजना सुरु केल्या जाणार आहेत. शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, स्मार्ट सिटी योजनेतील नवीन विकास कामे आणि त्या अनुषंगाने वाढलेले मानांकन, प्रदूषण पातळी कमी करुन नागरिकांना शुद्ध व स्वच्छ आल्हाददायक वातावरण रहावे, या हेतूने शहरात इलेक्ट्रिक बस असणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत 7 मीटर आणि 9 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास स्थायी समितीने उपसूचनेद्वारे मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.