Pimpri News : आता दर महिन्याला महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वादाचा होणार निवाडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ‘तक्रार निवारण दिन’ आयोजित केला जाणार आहे. अनेकवेळा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजावरून वादाचे प्रसंग येतात. त्यामधून वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपदेखील केले जातात, तसेच काही अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना हेतूपुरस्सर त्रास दिला जातो. याबाबतचा फैसला करण्यासाठी महापालिकेने तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी आणि कार्यरत यांच्या तक्रारींवर योग्य आणि वेळेत निर्णय घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील कार्यरत तसेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कार्यालयीन तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी संबंधित विभागाकडे येत असतात. मात्र, विभागप्रमुखांच्या निष्क्रियतेमुळे या समस्या वेळेत सोडविल्या जात नाहीत. तक्रार अर्जावर तसेच निवेदनावर आवश्यक ती कार्यवाही
होणे अपेक्षित आहे. मात्र, संबंधित विभागाकडून अशा तक्रारींवर कार्यवाही न करता कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जातो. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत आयुक्त पाटील यांनी तक्रार निवारण दिन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार, प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास, त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस तक्रार निवारण दिन म्हणून पाळण्यात येईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुक्त असतील. सकाळी १० वाजता आयुक्तांच्या कक्षामध्ये हा कार्यक्रम सुरू होईल. ज्या कर्मचाऱ्यांची तक्रार असेल त्यांनी दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत अर्ज दोन प्रतींत कामगार कल्याण विभागाकडे पाठवावी लागणार आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे, त्या विभागाच्या विभागप्रमुखांकडे अर्ज पाठविण्यात येईल. यासाठी कर्मचाऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्यांना पोहचपावती देण्यात येईल.

तक्रार निवारण दिनाच्या दिवशी ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभागाच्या विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे लागणार आहे. अर्जदारांच्या तक्रारींवर नियम, विभागाची भूमिका, तरतुदी या बाबींचा विचार करून तक्रार निवारण दिन प्रमुख योग्य निर्णय देतील. अर्जदाराला अंतिम उत्तर तक्रार निवारण दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देण्यात येईल, असे राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तक्रार निवारण दिनाच्या दिवशी आलेले अर्ज, त्यावर झालेली सुनावणी अर्जदारांनी केलेले आरोप या सर्व बाबी संगणकीकृत करण्याची जबाबदारी माहिती आणि तंत्रज्ञान विभागावर सोपविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.