PCNTDA Lottery : प्राधिकरण गृहप्रकल्प सदनिकांची 21 मे रोजी सोडत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत सेक्टर 12 येथे विकसित करण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील अल्प उत्पन्न गट व आर्थिक दुर्बल गट प्रकारातील सदनिकांसाठी मागवलेल्या अर्जाची 21 मे रोजी ऑनलाईन सोडत काढली जाणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता अल्पबचत भवन, पुणे येथे आयोजित ही सोडत काढण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त सुहास दिवसे उपस्थितीत राहणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

लॉटरीची सोडत चार सदस्यीय ‘ओव्हरसाईट कमिटी’च्या नियंत्रणाखाली होणार असून या कमिटीमध्ये सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, उपायुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, पुणे व Information and Communication technology Officer, म्हाडा, मुंबई यांचा समावेश आहे.

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे अर्जदारांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची अनुमती नाही. या कार्यक्रमाचे फेसबुक व युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. सोडतीसाठी अर्जदारांचे प्रतिनिधी म्हणून मर्यादित 10 अर्जदारांना उपस्थित रहाण्याबाबत या कार्यालयामार्फत कळविले जाईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सोडतीची लिंक 20 मे रोजी अर्जदारांना मेसेजव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याव्दारे अर्जदार घरबसल्या लॉटरी सोडतीचा लाईव्ह कार्यक्रम पाहू शकतात. यशस्वी लाभार्थ्यांची निवड यादी व प्रतिक्षा यादी त्याच दिवशी www.pcntda.org.in या संकेतस्थळावर व http://lottery.pcntda.org.in या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.