PCNTDA NEWS: प्राधिकरणाचा 8 कोटी 78 लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) सन 2021 – 22 या आर्थिक वर्षाचा 778 कोटी 87 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज (गुरुवारी) मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी 681 कोटींची तजवीज केली आहे. 8 कोटी 78 लाख 70 हजार रुपये शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 348 वी सभा आज (गुरुवारी) पार पडली. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त सौरभ राव होते. मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी 779 कोटींचा अर्थसंकल्प सभेला सादर केला. त्यावर चर्चा करुन तो मंजूर करण्यात आला.

प्राधिकरणाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे यांनी हा अर्थसंकल्प तयार केला. हा अर्थसंकल्प 778 कोटी 87 लाख 92 हजार रुपये रकमेचा असून, त्यात 770 कोटी 9 लाख 22 हजार एवढा खर्च अपेक्षित आहे. 8 कोटी 78 लाख 70 हजार रुपयांची शिल्लक दर्शविण्यात आली आहे.

जमेच्या तपशीलामध्ये आरंभीची शिल्लक 101 कोटी 69 लाख दाखविण्यात आली आहे. महसुली जमा 4 कोटी 40 लाख रुपये आहे. त्यामध्ये ठेवींवरील व्याजातून 72 लाख, दंडापोटी 77 लाख आणि इमारत भाड्यातून 2 कोटी 87 लाख रुपये जमा अपेक्षित आहे.

तर, भांडवली जमा 672 कोटी 77 लाख रुपये आहे. त्यामध्ये विविध पेठांमधील भुखंड विक्रीतून 120 कोटी, गृहयोजनेतून 542 कोटी 23 लाख, अतिरिक्त अधिमूल्य आणि हस्तांतरण शूल्कातून 5 कोटी 33 लाख, विकास निधी व व्याजातून 4 कोटी 31 लाख आणि ठेकेदारांच्या ठेवीमधून 66 लाख जमा अपेक्षित धरण्यात आली आहे. एकूण महसुली आणि भांडवलीतून 778 कोटी 87 लाख जमा अपेक्षित धरण्यात आली आहे.

खर्च तपशीलामध्ये महसुली खर्चासाठी 88 कोटी 81 लाख रुपये प्रस्तावित आहे. त्यामध्ये कर्मचारी आस्थापना 17 कोटी 30 लाख, आकस्मिक निधी 66 कोटी 50 लाख रुपये आहे. तर, भांडवली खर्चासाठी 681 कोटी 27 लाख रुपये प्रस्तावित आहेत.

विविध विकास कामे 61 कोटी 94 लाख, उद्यान, पर्यावरण, सुधारणा व शहरी वनीकरणासाठी 2 कोटी 32 लाख रुपये, भूसंपादनासाठी 50 कोटी आणि बांधकाम व इतर कामांसाठी 562 कोटी 76 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध पेठांमधील गृहयोजना कामाकरिता 452 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.