PCNTDA News: प्राधिकरणाचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा गुरुवारी अर्थसंकल्प

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या (गुरूवारी) होणा-या प्राधिकरण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

आकुर्डीतील कार्यालयात पीसीएनटीडीएचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. प्राधिकरणाचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 640 कोटी 88 लाख रुपये रकमेचा होता. 5 लाख 18 हजार शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प होता.

पीसीएनटीडीए प्रशासनाकडून करण्यात येणा-या गृहप्रकल्पांपैकी वाल्हेकरवाडी गृहप्रकल्प आणि पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या दोन्ही गृहप्रकल्पांतील सदनिकांच्या विक्रीसाठी अद्याप अर्ज मागविणे बाकी आहे. त्यामुळे प्राधिकरणाला या दोन्ही गृहप्रकल्पांमधून अद्याप एक रूपयाचेही उत्पन्न मिळालेले नाही.

या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाच्या गुरुवारी मांडल्या जाणा-या अर्थसंकल्पात जमा – खर्चाचा ताळेबंद कसा मांडला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्राधिकरणाची शिलकी अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा आहे. यंदा देखील हीच परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पाला पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव देखील प्राधिकरण सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 6 जुलै 2019 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने वारंवार मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.