Chakan Crime News : कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार; चाकणच्या तळेगाव चौकातील घटना

एमपीसी न्यूज – अवजड कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात पादचारी ठार झाल्याची घटना चाकण (ता.खेड) येथील तळेगाव चौकात गुरुवारी (दि.26) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी अवजड कंटेनर चालकास वाहनासह ताब्यात घेतले आहे.
     

दुर्घटनेत ठार झालेल्या व्यक्तीची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही.गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिक बाजूकडून आलेला कंटेनर (क्र.आर जे 23 जी बी 7039) चाकण येथील तळेगाव चौकात वळून शिक्रापूर बाजूकडे जात होता.वाहतूक पोलिसांच्या चौकातील निवारा केंद्राच्या समोरच अनोळखी पादचारी व्यक्ती वळणाऱ्या कंटेनरखाली चिरडला गेला.अवजड कंटेनरची चाके अंगावरून गेल्याने छिन्नविछिन्न मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले आहे.चाकण पोलिसांत याबाबत कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

दरम्यान वडगाव – तळेगाव – चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरील प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी वळणे, कमी रुंदी आणि अपघातप्रवण ठिकाणे यामुळे हा महामार्ग धोकादायक झाला आहे.या रस्त्याचे लालफितीत अडकलेले काम सुरू करण्याची मागणी होत आहे.या मार्गावर दुचाकीस्वार,पादचारी चिरडले जाणे, गॅस टँकर धोकादायक वळणांवर उलटणे, सिग्नल चौकात वाहने एकमेकांवर आदळणे, रस्ता दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे असे प्रकार सातत्याने होत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.