Chikhali : बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणा-या कुदळवाडीतील रुग्णालयावर दंडात्मक कारवाई

दंडात्मक कारवाई केल्याने डॉक्टरची महापालिका कर्मचा-याला धमकी

एमपीसी न्यूज – वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) उघड्यावर टाकल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुदळवाडीतील लोटस मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली.

दरम्यान, कारवाई केल्याने ”मी आता दंडाची रक्कम भरलेली आहे. पण, तुला नंतर पाहून घेईन. तुझ्या साहेबाला देखील पाहून घेईल” अशी धमकी डॉक्टरने महापालिका कर्मचा-यांना दिली. पिंपरी-चिंचवड परिसरात लहान-मोठे दवाखाने आहेत. रुग्णांसाठी वापरण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे ठराविक दवाखान्यातून ती वैद्यकीय प्रकल्पाला देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवला जातो. मात्र, उपनगर भागात असणारे छोटे मोठे दवाखाने, क्लिनिक यांच्याकडून वैद्यकीय कचरा गावाजवळील रिकाम्या जागेवर अथवा ओढे, नाल्यात टाकला जातो. मागील आठवड्यात थेरगाव येथे असाच प्रकार समोर आला होता.

पिंपरी-चिंचवड भागातील कुदळवाडी येथील लोटस मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे कर्मचारी आज (बुधवारी) बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकताना ‘क’  क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी मारुती शिंदे यांनी समक्ष पाहिले. यानंतर आरोग्य निरीक्षक वैभव गौडा यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर लोटस हॉस्पिटलच्या डॉ. वैभव लांडे यांना घटनास्थळी बोलावून दंड ठोठावला. मात्र यांनतर डॉ. लांडे यांनी मनपा कर्मचा-यांना दमदाटी केली. “आता दंड भरला मात्र नंतर पाहून घेतो” अशी दमबाजी आरोग्य कर्मचा-यांना केल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले.

लोटस रुग्णालय हे 15 बेडचे असून त्यांच्याकडील बायोमेडिकल वेस्ट कलेक्शनच्या अहवालानुसार त्यांनी 3 महिन्यात केवळ 24 किलो कचरा जमा केला आहे. त्यामुळे रुग्णालयात जमा झालेल्या कच-याची उघड्यावर विल्हेवाट लावली जाते हे स्पष्ट झाले असेही,  डॉ. रॉय यांनी सांगितले. शहरातील वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट मानकांप्रमाणे लावली जावी. यासाठी नियमावली तयार करण्यात आलेली आहे. मात्र, काही वैद्यकीय आस्थापना याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय अनेकदा कर्मचा-यांना दमदाटी केल्याचेही प्रकार घडतात. असे प्रकार करणा-या संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.