Pune : कचरा प्रक्रिया प्रकल्प नसणा-या 113 सोसायट्यांकडून 4,92,295 रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये निर्माण होणार्‍या कचर्‍यावर सोसायटीमध्येच प्रक्रिया करून तो जिरविण्याचे महापालिकेने बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने कचरा प्रक्रिया प्रकल्प नसणार्‍या 113 सोसायट्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 92 हजार 295 रुपये दंड वसूल केला आहे. दरम्यान, 19 नोव्हेंबर 2018 पासून आजवर पालिका प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर घाण करणार्‍या तब्बल 33 हजार 602 कारवाया करून 75 लाख 12 हजार 424 रुपये दंड वसूल केला आहे.

शहरातील मोठ्या सोसायट्या, मोठ्या आस्थापना आणि शंभर किलो पेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्‍यांनी आपल्याच परिसरात ओला व सुका कचरा जिरविण्याचे महापालिकेने आवाहन केले होते. यासाठी पालिकेच्या वतीने प्रकल्प उभे करण्यासाठी आणि बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी अवधी देऊन जनजागृती केली होती. ओला कचरा प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिक सहाय्य पुरविणार्‍या विविध कंपन्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. नोटीस देऊनही प्रकल्प सुरू न करणार्‍या सोसायट्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

शहरात मोठ्या 20 हजाराच्या आसपास सोसायट्या आहेत. सत्तरपेक्षा जास्त सदनिका असणार्‍या सोसायट्यांना परिसरात कचरा जिरविणे पालिकेने बंधनकारक केले आहे. किती सोसायट्यांमध्ये प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत. किती सोसायट्यांमधील प्रकल्प बंद आहेत. याबाबत पालिकेने सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये 730 सोसायट्यांमध्ये कचरा प्रकल्प कार्यान्वित तर 233 प्रकल्व बंद असल्याचे आढळले. त्यानंतर 233 सोसायट्यांना कचरा प्रक्रिया प्रकल्प नसल्याने नोटीस देण्यात आल्या. नोटीस देऊनही कार्यवाही केली नाही, म्हणून 113 सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करून 4 लाख 92 हजार 295 रुपये दंड वसूल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.