Penalty To BCCI : ‘बीसीसीआय’ला भरावा लागणार 4800 कोटींचा दंड

BCCI to pay Rs 4,800 crore fine : मुंबई उच्च न्यायालयाच्या लवादाचा दणका

एमपीसी न्यूज – इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा सीझन जिंकणाऱ्या डेक्कन चार्जर्सचे मालक डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्स लिमिटेड यांचा करार 2012 मध्ये अचानक रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या लवादाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 4800 कोटींचा दंड ठोठावला आहे.

आर्थिक व्यवहार योग्यपणे न हाताळण्याचे कारण देत ‘बीसीसीआय’ने 15 सप्टेंबर 2012 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्धचा करार मोडीत काढला होता. डेक्कन चार्जर्सने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने त्या प्रकरणासाठी लवाद म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सी. के. ठक्कर यांची नियुक्ती केली होती. लवादाकडून देण्यात आलेल्या निर्णयानुसार बीसीसीआयला 4800 कोटी रुपये देणे बंधनकारक आहे.

डेक्कन चार्जर्सने याचिका दाखल करताना विविध दावे बीसीसीआय विरुद्ध केले होते. दंड ठोठावताना न्यायालयाकडून सप्टेंबर 2020 पर्यंतची नुकसान भरपाई नमूद करण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयीन निकालाची प्रत अद्याप आम्हाला मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे ‘बीसीसीआय’चे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी सांगितले आहे.

डेक्कन चार्जर्स 100 कोटी रुपयांची बँक गॅरंटी सादर करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे बीसीसीआयने फ्रँचायझीचा करार रद्द केला होता. त्यानंतर डेक्कन क्रॉनिकल या कंपनीने बीसीसीआय विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिका दाखल केली होती.

आयपीएलमधून बेकायदेशीरपणे बाहेर काढण्यात आले असल्याचा आरोप डेक्कन क्रॉनिकलने बीसीसीआयवर केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.