Pimpri news: स्थायीचा धमाका; शेवटच्या सभेत साडेचारशे कोटींच्या विकासकामांना मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरा पार पडली. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि  विषयपत्रिकेवरील विषयांच्या एकूण सुमारे 437 कोटी रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रभाग क्र.11 मधील स्वामी विवेकानंद हॉल ते थरमॅक्स चौकाकडे जाणा-या रस्त्याचे तसेच कृष्णानगर मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 22 कोटी खर्च केले जातील. नेहरुनगर परिक्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांचे परिचालन आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी 1 कोटी 75 लाख खर्च होणार आहे. प्रभाग क्र.24 मधील आरक्षण क्र.628 खेळाच्या मैदानात सिंथेटीक ट्रॅक बांधण्यासाठी 72 लाख रुपये खर्च केले जातील.

सेक्टर क्र.29 मधील भाजी मंडई परिसर विकसित करण्यासाठी 42 लाख रूपये खर्च होणार आहे.
आकुर्डी गावठाण, गंगानगर आणि इतर परिसर, पिंपळे सौदागर व रहाटणी येथील जलनि:सारण विषयक सुधारणा कामे आणि नलिका टाकण्यासाठी 1 कोटी 10 लाख रुपये खर्च होतील. चिखली, कासारवाडी, चिंचवड, पिंपळे निलख, किवळे मैला शुद्धीकरण केद्रांतर्गत येणा-या मैला पंप हाऊसेसचे चालन देखभाल दुरुस्तीसाठी 9 कोटी 53 लाख रुपये खर्च येणार आहे.

भोसरी येथील सर्व्हे नं.1 शेजारील नाल्याची सुधारणा आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 17 कोटी रुपये खर्च येणार आहे. चिखली येथील सेक्टर क्र.17आणि क्र.19 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या गृह प्रकल्पामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 62 लाख खर्च होतील. काळेवाडी फाटा ते एमएम शाळेपर्यंतच्या तसेच सांगवी किवळे बीआरटीएस रस्त्यावर पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करण्याच्या कामासाठी 31 कोटी 18 लाख इतका खर्च होणार आहे.

भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या रस्त्यावर बस स्थानक बांधण्यासाठी 7 कोटी 67 अशा 437 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.