Nashik News : निवडणूक आयोगाकडून बिनविरोध उमेदवार घोषित करण्याची परवानगी

येवला तालुक्यातील मौजे कातरणी येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुद्धा लिलावामुळे रद्द

एमपीसी न्यूज : नाशिक जिल्ह्यात 11 डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूकांबाबत आचारसंहिता घोषित करण्यात आली होती. या दरम्यान  देवळा तालुक्यातील मौजे उमराणे व येवला तालुक्यातील मौजे कातरणी  या दोन ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडून येत असलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायातीमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याची घोषणा करण्याची परवानगी निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य या पदांचा लिलाव झाल्याबाबत अहवाल सादर करण्यात आला होता.तसेच येवला तालुक्यातील मौजे कातरणी या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये सदस्य पदाच्या लिलावसह प्रभाग क्रमांक १ मधील अनुसूचित जाती (स्त्री) या पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत इतर उमेदवारांवर दबाव आणल्याबाबत निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. या अनुषंगाने वरील दोन्ही ग्रामपंचायतींच्या  सर्व सदस्य पदांसाठीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींच्या निवडणूकीमध्ये सदस्य पदासाठी लिलावासारखा  अनुचित प्रकार आणि न्यायालीयन प्रकरणे दाखल झालेली नाहीत, असे जिल्हाधिकारी, सर्व संबंधीत तहसिलदार आणि निवडणूक निरिक्षक यांच्याकडून निवडणूक आयोगास कळविण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी  सांगितले आहे.

जिल्ह्यातील उमराणे व कातरणी या दोनही ग्रामपंचायती व्यतिरिक्त इतर ग्रामपंचायतीमध्ये  झालेल्या निवडणूकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची घोषणा करण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.