Pimpri News : छोटेखानी कला प्रकारांच्या सादरीकरणासाठी परवानगी मिळावी; राष्ट्रवादीच्या कलाकार विभागाची मागणी

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला वा सांस्कृतिक विभागाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना छोटेखानी कला प्रकार सादर करण्याची परवानगी मिळण्यात यावी यासाठी मंगळवारी(22 सप्टेंबर) निवेदन देण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश समन्वयक संतोष साखरे, कला विभाग अध्यक्ष विजय पानसरे, उपाध्यक्ष संदीप जगदाळे, विनोद मांजरेकर, सरचिटणीस चंद्रकांत नगरकर, चिटणीस आमीर शेख आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

मागील सुमारे सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे छोटेखानी कलाप्रकार करणा-या कलावंतांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. भारुड, गोंधळ, जागरण, ऑर्केस्ट्रा, संगीत बारी, जादूगार आदी लोककला प्रकार सादर करणारे कलाकार हाताला काम नसल्यामुळे हलाखीचे जीवन जगत आहेत. आता विविध टप्प्यांमध्ये अनलॉक असूनही या कलाकारांवर अनेक बंधने आहेत. त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेले काम करण्याची मुभा नाही. त्यामुळे त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे निवेदन देण्यात आले आहे.

महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी खास लक्ष घालून या कलाकारांची मागणी मान्य करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येईल, असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.