Pimpri : महापालिकेतील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी ‘ओळख’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्यात येणार आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणा-या लाभाकरिता कार्यालयात ये-जा करण्यासाठी, सरकारी रुग्णालयातील औषधोपचार घेणे, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँकेत उपयोग करण्यासाठी, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी म्हणून समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी एक कायमस्वरुपी ओळखपत्र देण्यात येणार आहे.  याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पारित केला आहे. खासगी ठिकाणावरुन बनवून घेतलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तसे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.

राज्य सरकारच्या प्रशासन विभागाने शासकीय सेवेत कार्यरत, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणा-या लाभासाठी एक कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याबाबत महापालिकेला कळविले आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणा-या सर्व लाभांसाठी कायमस्वरुपी ओळखपत्र दाखविल्यास संबंधित कार्यालयात ये-जा करणे सोपे होईल. निवृत्तीवेतनाबाबतची कार्यवाही मुदतीत व्हावी. सरकारी रुग्णालयातील औषधोपचार घेणे, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँकांमध्ये उपयोग करण्यासाठी त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसेच सरकारी सेवानिवृत्त अधिकारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्यादृष्टीने मदत होईल.

ज्या अधिकारी, कर्मचा-यांकडे ओळखपत्र नसतील किंवा खराब झाली असतील. अथवा पद्दोनती झाली असेल अशा अधिकारी, कर्मचा-यांनी महापालिकेकडून ओळखपत्र मिळण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज, एका फोटोसह विभागप्रमुखांच्या शिफारशीने प्रशासन विभागाकडे पाठवायचा आहे. ओळखपत्र देण्याचे काम प्रशासन विभागामार्फत केले जाणार आहे. अधिकारी ज्या पदावर कार्यरत आहेत. त्या पदाचे एकदाच विनाशुल्क ओळखपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्र गहाळ अथवा खराब झाल्यास दुस-यांदा ओळखपत्र घेण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच विभागप्रमुखांमार्फत अर्ज आल्यावरच पुन्हा ओळखपत्र देण्यात येईल. जुने ओळखपत्र कार्यालयात जमा करावे लागणार आहे. विभागप्रमुखांच्या मान्यतेशीवाय, शिफारशीशिवाय खासगी ठिकाणीहून बनवून घेतलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसे आढळल्यास नियमाधीन कारवाई करण्यात येईल.

सद्यस्थितीत महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या वापरातील जुने ओळखपत्र नवीन ओळखपत्र दिल्यानंतर संबंधित विभागात जमा करुन घेतले जाणार आहे. तसा अहवाल प्रशासन विभागाला सादर करावा लागणार आहे. नवीन ओळखपत्र दिल्यानंतर जुने ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. सुरक्षा विभागाने ओळखपत्र पाहूनच महापालिकेत प्रवेश द्यावा. कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांनी महापालिका कार्यालयात प्रवेश करताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. ओळखपत्र न लावणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर विभागप्रमुखांनी योग्य ती कारवाई करावी. महापालिकेतील प्रशिक्षणार्थी, मानधनावरील कर्मचा-यांना त्यांच्या नेमणूक कालावधीपुरतेच व विहीत शुल्क आकारुन ओळखपत्र देण्यात येईल. नेमणूक कालावधी पूर्ण झाल्यानंतर, असे ओळखपत्र जमा करून घेण्यात येणार आहे.

सेवानिवृत्त अधिका-यांना लेखा विभागाच्या शिफारशीनुसार ओळखपत्र

पिंपरी महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या (हयात असलेल्या) अधिकारी, कर्मचा-यांना लेखा विभागाच्या शिफारशीनुसार तसेच अर्जासोबत निवृत्ती वेतनाचे आदेश जोडून एकवेळ मोफत ओळखपत्र दिले जाईल. त्यांचे महापालिका सेवेतील पूर्वीचे ओळखपत्र जमा करुन घेण्यात येईल. दुबार ओळखपत्राची मागणी केल्यास वाजवी किंमत घेऊन ते द्यावे. लेखा विभागामार्फत प्रमाणित करुन प्रशासन विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे. लेखा विभागानेच प्रमाणित करून दिलेल्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांना (हयात असलेले) विहित नमुन्यात अर्ज आल्यास ओळखपत्र देण्यात येणार आहे. परस्पर ओळखपत्र दिले जाणार नाही. याची लेखा विभाग, प्रशासनाने खबरदारी घ्यावी.

यापुढे प्रशासन विभागामार्फतच मिळणार ओळखपत्रे

यापुढे अधिकारी, कर्मचा-यांना विहित नमुन्यातील ओळखपत्रे प्रशासन विभागामार्फत देण्यात येतील. ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गोल शिक्क्याची मोहोर उमटवावी. गट ‘अ’ मधील कार्यरत अधिका-यांच्या ओळखपत्रावर आयुक्तांची स्वाक्षरी असणार आहे. तर, गट ‘ब’,’क’,’ड’ मधील अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सेवानिवृत्ती वेतनधार अधिकारी, कर्मचारी यांच्या ओळखपत्रावर प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांची स्वाक्षरी असणार आहे. हे ओळखपत्र स्मार्टकार्ड स्वरुपात असणार आहे. त्यासाठी लागणारी प्रिटींग मशीन, कोरे कार्ड, कव्हर यासह इतर साहित्य भांडार विभागामार्फत प्रशासन विभागास उपलब्ध करुन देण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.