Pimpri : गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणावर सशस्त्र हल्ला

Persons attacked with sharp weapons in Pimpri demanding withdrawal of police complaint

एमपीसी न्यूज – पोलिसात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तीन जणांनी धमकी देत तरुणावर सशस्त्र हल्ला केला. यामध्ये तरुण आणि त्याचे दोन मित्र जखमी झाले. आहेत ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली.

राहुल बापुराव टोणपे (वय 26, रा. मिलिंदनगर पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल बेद (वय 30), कपिल किसन बेद (वय 28), करण टाक (वय 20, सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास फिर्यादी राहुल आणि त्यांचे मित्र रोहित मोरे व शुभम रोकडे हे मिलिंदनगर, पिंपरी येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी कुणाला त्यांच्याजवळ आला. त्याने राहुल यांना हाक मारून बोलावून घेतले.

‘मी तुला एक महिन्यापासून समजावत आहे. माझ्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घे. मला सरकारी नोकरी करायची आहे. मी सांगितलेलं तुझ्या लक्षात येत नाही का. आम्ही तुला गायब करू.’ अशी धमकी आरोपी कुणाल याने फिर्यादी राहुल यांना दिली. त्यानंतर कुणाल याने राहुल यांच्या डोक्यात कोयता मारला. मात्र राहुल यांनी तो चुकविल्याने त्यांच्या हातावर जखम झाली.

राहुल यांना मारल्याने त्यांचा मित्र शुभम रोकडे याने आरोपी कुणाल याला पकडून ठेवले. आरोपी करण याने फिर्यादी यांना चाकूने मारण्याचा प्रयत्न केला असता रोहित मोरे मध्ये पडले. त्यामुळे रोहित यांच्या हातावर चाकूचा वार झाला.

यानंतर आरोपी कपिली याने शेजारी पडलेली बियरची रिकामी बाटली रोहित यांच्या डोक्यात फोडली. तसेच तिन्ही आरोपींनी फिर्यादी राहुल आणि त्यांच्या दोन मित्रांना बेदम मारहाण केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.