Pune News : पाळीव कुत्रा भुंकल्याने मालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : रात्रीच्या वेळी घरासमोरील अंगणात घेऊन जात असताना पाळीव कुत्रा भुंकण्याचा कारणावरून कुत्र्याच्या मालकाला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माळीमळा या ठिकाणी गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी विष्णू राघू घाडगे (वय 53) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार केदरास पाटोळे आणि विलास केदरास पाटोळे यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे बँक ऑफ इंडिया मध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. लोणी काळभोर गावच्या हद्दीतील माळीमळा या ठिकाणी ते कुटुंबियासह राहतात. दरम्यान गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा कुत्रा आरोपी यांच्याकडे पाहून भुंकला होता. याच कारणावरून आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी फळीने मारहाण केली.

फिर्यादी चा मुलगा हा भांडण सोडविण्यासाठी आला असताना आरोपीने त्यालाही शिवीगाळ करत दमदाटी केली. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बंडगर करीत आहेत

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.