Pune News : काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी केंद्रीय सचिवांच्या नावाने मेट्रोच्या संचालकाला फोन

एमपीसी न्यूज : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे प्रमुख व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांना फोन करून मेट्रोचे कॅन्ट्र्क्ट मिळवून देण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी व कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोनही अधिकाऱ्यांना फोन करणारी व्यक्ती एकच असण्याची शक्यता आहे. याबाबत पीएमआरडीएचे प्रमुख सुहास दिवशे (रा. पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमआरडीएकडून शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे काम केले जात आहे. १६ जानेवारी रोजी दिवसे हे घरी असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने केंद्रीय ग्रामविकास खात्याचे सचिव डी. एस. मिश्रा असल्याची बतावणी केली. दिवसे यांना मेट्रोच्या ठेकेरादारांची माहिती विचारून त्यांना फोन करण्यास सांगितले.

मेट्रोचे ठेकेदार गुप्ता यांच्याकडून आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने त्यांना सतत फोन केले. त्यांना हा संशयास्पद प्रकार वाटल्यानंतर त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांना हा सर्व फसवेगिरी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात स्वतः जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी सहायक निरीक्षक राजेंद्र दहिफळे हे अधिक तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशनचे लि.  कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे (वय ५२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरात मेट्रोच्या कामास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्याचे काम महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशन लि. कडून वेगवेगळ्या मार्गावर मेट्रोचे काम केल जात आहे. तक्रारदार बिऱ्हाडे यांना २६ डिसेंबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन केला.

त्या व्यक्तीने देखील स्वतःचे नाव गृहनिर्माण व नागरी मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा बोलत असल्याचे सांगितले. मेट्रोचे ट्रॅक प्लिंथ कंत्राटदार यांच्या ठेकेदारांना फोन करायला सांगा. तसेच, त्यांचे क्रमांक देण्यास सांगितले. तक्रारदार यांना थोडासा संशय आल्यामुळे त्यांनी  हा प्रकार त्यांचे प्रमुख ब्रिजेश दिक्षीत यांच्या कानावर घातला. त्यावेळी त्यांनी दक्षता घेण्यास सांगितले.

फोन करणारी व्यक्ती ही सचिव आहेत, हा पाहण्यासाठी व्हॉट्स अप पाहिले. त्यावर देखील मिश्रा यांचाच फोटो असल्याचे दिसले. त्याबरोबरच ट्रू कॉलवर देखील त्यांचे नाव नोंदणी केले होते. या सर्व गोष्टीमुळे समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसविण्यासाठी आरोपीने हा खाटाटोप केला असण्याची शक्यता आहे. बिऱ्हाडे यांना सतत फोन आल्यानंतर त्यांना देखील हा सर्व संशयास्पद प्रकार असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार या प्रकरणी आयटी अक्ट व इतर कमलानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.