Crime News : नोकरी लावली नाही म्हणून फिजिओथेरपिस्ट महिलेचा दोघांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – जीममध्ये मुलाखत दिल्यानंतरही नोकरी लावली नाही म्हणून फिजीओथेरेपीस्ट महिलेने जीम व दवाखान्यात तोडफोड करत दोघांवर जिवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.4) रात्री साडेआठ आणि नऊ वाजता घडली.

 

 

निगडी पोलिसांनी फिजिओथेरपिस्ट असलेल्या डॉक्टर महिलेला अटक केली आहे. तसेच पहिल्या प्रकरणात डॉ. राजीव अजित नगरकर (वय 51, रा.यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिजिओथेरपिस्ट डॉक्टर महिला (वय 29, रा. कोंढवा, पुणे. मूळ रा. भोपाळ, मध्य प्रदेश) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयुरेश मोरे यांच्या जिममध्ये ट्रेनरची जागा भरायची असल्याने त्यांनी याबाबत सोशल मीडियावर जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून आरोपी महिलेने सोशल मीडियावर संपर्क केला.मात्र मयुरेश मोरे यांनी आरोपी महिलेला ट्रेनर पदावर काम करण्यासाठी सोशल मीडियावरच नकार दिला होता.याच्या रागातून महिलेने फिर्यादी नगरकर यांचा यमुनानगर येथे दवाखाना आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता आरोपी महिला दवाखान्यात आली.दवाखान्याच्या कौन्सिलिंग रूममध्ये येऊन टेबलावरील काचेचा ग्लास, मोबाईल, लॅपटॉप, काचेची दवाखान्याची फ्रेम महिलेने तोडफोड केली.

 

 

माझ्या पतीला फोन करा नाहीतर मी आत्महत्या करेन.तुम्ही पोलिसांना बोलावले तर मी आत्महत्या करेन, अशी तिने नगरकर यांना धमकी देत त्याच्या हाताला चावा घेतला.नगरकर दवाखान्याच्या बाहेर आले असता महिलेने, माझ्या पतीला बोलवा, मी स्वतःला का मारू. मी फक्त तुम्हाला मारणार, अशी धमकी देऊन नगरकर यांच्या अंगावर काचेचा तुकडा घेऊन मारण्यासाठी आली. काचेच्या तुकड्याने वार करून नगरकर यांना महिलेने जखमी केले.

 

त्यानंतर आरोपी महिला आकुर्डी प्राधिकरण येथील बीच बॉडीज या जिममध्ये रात्री नऊ वाजता गेली. जिममध्ये एक महिला आणि जिमचे मालक साहित्याची आवराआवर करून घरी निघत होते. जिममध्ये येऊन आरोपी महिलेने, मी तुम्हाला ठार मारेन, अशी धमकी देत जिममधील महिलेला डंबेल फेकून मारला. त्या महिलेला वाचवताना जिमचे मालक मयुरेश केशव मोरे यांच्या हाताला मुकामार लागला.आरोपी महिलेने काचेच्या तुकड्याने सर्वांना भीती दाखवून दहशत निर्माण केली.याबाबत जिममधील महिलेने खुनाच्या प्रयत्नाची फिर्याद दिली आहे.यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.