Kamshet : पिकअपची ट्रकला धडक; पिकअपमधील एकासह 16 मेंढ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला मेंढ्या घेऊन जाणा-या पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअपमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. पिकअपमधील 16 मेंढ्यांचा देखील मृत्यू झाला असून 8 मेंढ्या जखमी झाल्या आहेत. हा अपघात रविवारी (दि. 28) पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर बऊर गावाजवळ घडला.

अमोल सुभाष मोरे ( वय 30 रा. रासीवडे ता. राधानगरी जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक (एम एच 12 / एफ झेड 4751) अलिबाग वरून दगडी कोळसा भरून निघाला. रविवारी पहाटे बऊर गावाजवळ ट्रक आला असता ट्रकचा डाव्या बाजूचे मागचे टायर फुटले. त्यामुळे ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका पिकअपने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत क्लीनरच्या बाजूला बसलेल्या अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअप चालक रमजान बाबासाहेब सय्यद (रा. किकपूरी, ता. राधानागरी, जि. कोल्हापूर) हा किरकोळ जखमी झाला. पिकअपमध्ये मेंढ्या होत्या. या धडकेत पिकअपमधील 16 मेंढ्यांचा मृत्यू झाला. तर आठ मेंढ्या जखमी झाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.