Pimple gurav: अर्जुन पुरस्कार विजेत्या दत्तू भोकनाळचा आमदार लक्ष्मण जगतापांकडून सन्मान

एमपीसी न्यूज – देशाचा आघाडीचा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी नौकानयनपटू (रोइंग), महाराष्ट्राचा सुपूत्र दत्तू भोकनाळ यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी यंदाच्या वर्षीच्या अर्जुन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. खेळातील हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दत्तू भोकनाळ यांचा आज (शुक्रवारी) सत्कार करण्यात आला.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील सहा खेळाडूंना यंदाच्या वर्षीचा अर्जुन पुरस्कार जाहीर केला होता. त्यामध्ये नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, घोडेस्वार सुभेदार अजय सावंत, कुस्तीपटू राहुल आवारे, पॅरा स्वीमर सुयश जाधव, खो-खोपटू सारिका काळे आणि टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर या सहा जणांचा समावेश आहे.

या सर्वांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकताच अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरविले.

नौकानयन या अवघड अशा खेळातील योगदानाबद्दल अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांनी दत्तू भोकनाळ याचा शुक्रवारी सत्कार केला. त्याच्या खेळाचे आमदार जगताप यांनी कौतुक केले. तसेच भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दत्तू हा नौकानयन खेळात अर्जुन पुरस्कार मिळविणारा महाराष्ट्रातील पहिला खेळाडू आहे. त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. दत्तूने नौकानयन खेळात दिलेले योगदान या खेळाची आवड असलेल्या अन्य खेळाडूसाठी प्रेरणा देणारी आहे. त्याच्या खेळाकडे पाहून अनेक नवीन खेळाडू स्वतःला घडवतील आणि त्याच्यासारखेच अर्जुन पुरस्कारापर्यंत मजल मारतील, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

दत्तू भोकनाळ याने पटकावलेली पदके

दरम्यान, दत्तू भोकनाळने 2014 मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत दोन सुवर्ण पदके, 2015 एशियन चॅम्पियन शिप एक रौप्य पदक, 2016 एशियाना आणि ओशियना ऑलिम्पिक पात्रता फेरी रौप्य पदक, 2016 अमेरिकन नॅशनल चॅम्पियनशिप एक सुवर्ण पदक, 2016 रिओ ऑलिम्पिक ब्राझील 13 वर्ल्ड रांकिंग, 2016 साली चीनमध्ये झालेल्या 16 व्या आशियाई रोइंग स्पर्धेत दत्तू भोकनळने रौप्य पदक, 2016 दक्षिण कोरियातल्या चुंग जू येथील ‘फिसा एशियन ॲन्डओशॅनिक ऑलिंपिक क्वालिफिकेशन’ या नौकानयनाच्या स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी सामन्यात रौप्य पदक, 2016 सालच्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी, भारताकडून रोइंगसाठी पात्र ठरलेला तो एकमेव खेळाडू, 2017 इनडोर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत एक सुवर्ण पदक, 2017 सीनियर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये दोन सुवर्ण पदक, 2017 महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिव छत्रपती पुरस्काराने सन्मान, 2018 सालच्या इंडोनेशिया मध्ये झालेल्या एशियन गेम्स मध्ये एक सुवर्ण पदक पटकावले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.