Pimple Gurav’मोहन हो या मायकल.. रोज चलाये सायकल!’ सायकलवरील संमेलनाने दिला इंधन बचतीचा संदेश

एमपीसी न्यूज- “शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकल चालवणे आवश्यक असून त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी सायकल ट्रॅक निर्माण झाले पाहिजेत ” असे मत सामाजिक कार्यकर्ते रमेश तांबे, प्रकाश बंडेवार यांनी व्यक्त केले. पिंपळे-गुरव येथील बसस्थानक चौकात रविवारी (दि.12) राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यसेनानी काकासाहेब गाडगीळ आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून शब्दधन काव्यमंचाने ‘मोहन हो या मायकल…रोज चलाये सायकल!’ या संकल्पनेवर आधारित सायकलवरील पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण कविसंमेलनात ते बोलत होते.

या कविसंमेलनात सुमारे वीस कवी सहभागी झाले होते. नगरसेवक सागर आंगोळकर, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, मराठवाडा जनविकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, ज्येष्ठ कवी अशोक कोठारी, सुभाष चव्हाण, नंदकुमार कांबळे, तानाजी एकोंडे, अण्णा जोगदंड, मीरा कंक, उज्ज्वला पवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमापूर्वी दिलासा संस्थेचे क्रियाशील सदस्य कै. अनिल पालकर यांना आदरांजली वाहण्यात आली. शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी गाऊन सादर केलेल्या “मोहन हो या मायकल…रोज चलाये सायकल!” या कवितेला नगरसेवक सागर आंगोळकर यांनी हिरवे निशाण दाखवले

संमेलनात सहभागी झालेल्या कवींनी तसेच तनय राकेश या छोट्या मुलाने सायकलवर बसून चौकात फेरी मारताना,
“नही चाहिए हमको स्कूटर
नही चाहिए बढिया मोटर
क्यू हम जाये लोकल?”
या काव्यपंक्तींचे सामुदायिक गायन केले.

सायकलमुळे आपोआप होणारा शारीरिक व्यायाम, प्रदूषणाला आळा, इंधनबचत, परकीय चलनाची बचत अशा आशयाच्या विविध कवितांनी उपस्थित नागरिकांच्या मनात सायकल चालविण्याविषयी सकारात्मक भावना दृढ केली.
कैलास भैरट यांनी,
“माझी सायकल सायकल
तिची गुणांची रं चाल
नको टाकाया तेल
धावे मारता पायंडल!”
अशी सायकलची महती सांगितली. कवयित्री माधुरी विधाटे यांनी,
“इंधनाच्या धुराने या
जीव कोंडला…
पडले हो छिद्र
ओझोन स्तराला!
जीवसृष्टी आपुली
हवी वाचायला…
इंधनबचत करू
सांगू या हो जगाला!”
असा संदेश दिला.
वर्षा बालगोपाल यांनी सायकलच्या प्रतीकातून मानवी व्यवहार आणि नातेसंबंध यांवर भाष्य केले.

आय.के.शेख यांनी सायकल चालवण्यातून सामाजिक एकोपा जोपासण्याचे आवाहन केले. निशिकांत गुमास्ते, फुलवती जगताप आणि शरद शेजवळ यांच्या गीतांनी सायकलमुळे शारीरिक तंदुरुस्ती कशी साधली जाते, हे श्रोत्यांच्या मनावर ठसवले. शिवाजीराव शिर्के, अरुण कांबळे, देवेंद्र गावंडे, राधाबाई वाघमारे, अंकुश अग्रवाल, विलास कुलकर्णी, शामराव सरकाळे, विजया नागटिळक यांच्या कविता उल्लेखनीय होत्या. ‘एक तासाची मालकीण’ या लघुकथेमधून मधुश्री ओव्हाळ यांनी पूर्वी भाड्याने सायकल घेण्याच्या पद्धतीवर खुसखुशीत भाष्य करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. बसस्थानकावरील असंख्य प्रवाशांनी या प्रबोधनपर कार्यक्रमाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या संयोजनात जयश्री गुमास्ते, उमेश सणस, प्रकाश घोरपडे, हृषीकेश कंक, श्रीनिवास पानसरे, रामा शिंदे, सुहास तांबे, विजय देशमुख यांनी परिश्रम घेतले. अण्णा गुरव यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शामराव साळुंखे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.