Pimple Gurav : जयपूर फूटमुळे दिव्यांगांना जगण्याची नवी उमेद व आत्मसन्मान – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज– चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळेगुरवमध्ये रविवारी (दि.१) दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या दिव्यांगांनी या शिबीराचा लाभ घेतला. शिबीर दिव्यांगांना न्यूनगंडातून बाहेर काढून जगण्याची नवी उमेद आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मसन्मान मिळवून देईल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
यावेळी महापौर उषा ढोरे, नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, शारदा सोनवणे, नगरसेवक सागर आंगोळकर, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, बाळासाहेब ओव्हाळ, प्रभाग सदस्य संदीप नखाते, गोपाळ माळेकर, विठ्ठल भोईर, विनोद तापकीर, राजू सावंत, संदीप गाडे, शेखर चिंचवडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, शारीरिकदृष्ट्या आपण इतरांपेक्षा कमकुवत असल्याने या स्पर्धेत टिकाव कसा धरायचा असा न्यूनगंड दिव्यांगांमध्ये निर्माण होतो. दिव्यांगांना या न्यूनगंडातून बाहेर काढण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर अनेक दिव्यांगांना जगण्याची नवी उमेद देईल. तसेच त्यांना आत्मसन्मानही मिळवून देईल. कृत्रिम हातापायांमुळे नवजीवन प्राप्त करून देण्याचा या शिबीराचा उद्देश आहे. दिव्यांगांना आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या विविध भागातील गरजू दिव्यांगांनी शिबीराला हजेरी लावली. त्यामध्ये अपघात, मधुमेह, रक्त वाहिन्यांचे आजार, गँगरीन व इतर कारणांमुळे पाय गमावलेल्या दिव्यांगांचा समावेश होता. प्रत्येक दिव्यांगाची नोंदणी करून तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. जयपूर फूट बसविण्यासाठी त्यांची योग्य मापे घेण्यात आली. आता या मापानुसार जयपूर फूट तयार करून दिले जाणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.