Pimple Gurav News : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागणीसाठी साहित्यीकांनी पाळले मौनव्रत

एमपीसी न्यूज : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यीकांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज पिंपळे गुरव येथे मौनव्रत पाळले.

या उपक्रमाचे आयोजन दिलासा संस्था, शब्दधन काव्यमंच आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद या संस्थांनी केले होते. यावेळी ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, समीक्षक प्रदीप गांधलीकर, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव गोर्ले, प्रकाशक नितीन हिरवे, दिलासा संस्था आणि शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण हे उपस्थित होते.

यावेळी डॉ. पी.एस. आगरवाल, वर्षा बालगोपाल, निशिकांत गुमास्ते, शामराव सरकाळे, भाऊसाहेब गायकवाड, विजया नागटिळक, रघुनाथ पाटील, आय.के. शेख, सुभाष शहा, सुनील सुंदर, मधुश्री ओव्हाळ, सुहास घुमरे, अनिल दीक्षित, फुलवती जगताप या साहित्यीकांसह उपस्थित असलेल्या सर्वांनी एक तासाचे मौनव्रत पाळून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वरी व तुकोबा यांच्या गाथेचे पूजन करून तसेच महात्मा गांधींच्या आवडत्या “वैष्णव जन तो येणे कहिए” याच्या गायनाने झाली. यावेळी समाजाचे हित साधिते ते साहित्य होय, असे किसन महाराज चौधरी यांनी सांगितले. तसेच शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांचे शहरात स्मारक व्हावे, अशी अपेक्षा पुरुषोत्तम सदाफुले यांनी व्यक्त केली.

प्रदीप गांधलीकर यांनी उपस्थितांना अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असलेले निकष आणि मराठी भाषेची प्राचीनता, याविषयी माहिती दिली. शोभा जोशी यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी समजावेत यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मत यावेळी मांडले.

कार्यक्रमाचा समारोप “रघुपती राघव राजाराम” या भजनाच्या सामूहिक गायनाने करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.